मुंबई : वसई-विरारकरांचा पाणी प्रश्न सोडविणाऱ्या सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत वसई-विरारला प्रतिदिन १८५ दशलक्ष लिटर पाणी सोडण्यास अखेर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुरुवात केली आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसई-विरार आणि मीरा-भाईंदर पालिका क्षेत्रातील पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर आहे. हा प्रश्न  सोडविण्यासाठी एमएमआरडीएने सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्प हाती घेतला. १३२५.७८ कोटी रुपये खर्चाच्या सूर्या प्रादेशिक पाणी प्रकल्पाचे काम २०१७ पासून हाती घेण्यात आले होते. या प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर वसई-विरारला प्रतिदिन १८५ दशलक्ष लिटर, तर मीरा-भाईंदरला प्रतिदिन २१८ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. हा प्रकल्प आतापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र काही कारणांमुळे या प्रकल्पास विलंब झाला. या प्रकल्पातील वसई – विरारला प्रतिदिन १८५ दशलक्ष पाणीपुरवठा करणारा पहिला टप्पा जून २०२३ मध्ये पूर्ण झाला आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर एमएमआरडीएने पाणी सोडणे आणि वसई – विरार पालिकेने पाणी घराघरांपर्यंत पोहचविणे अपेक्षित होते. पण जूनपासून या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होऊ न शकल्यामुळे  पाणीपुरवठा रखडला होता.

हेही वाचा >>> मुंबई: मृत्यू झालेल्या व्हेलचे गोव्यातील पथकाकडून शवविच्छेदन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्याचा निर्णय घेत एमएमआरडीएने त्यांची वेळ घेण्याचा प्रयत्न केला. पण मुख्यमंत्र्यांची वेळ न मिळाल्याने लोकार्पण रखडले आणि पहिला टप्पा कार्यान्वित झाला नाही. पुढे ऑक्टोबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून दोनदा वेळ देण्यात आली. मात्र पंतप्रधानांचा दौरा रद्द झाल्याने हा मुहूर्त गाठता आला नाही आणि वसई-विरारकर तहानलेलेच राहिले. सूर्या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असतानाही पाणी सोडले जात नसल्याने वसई-विरारकरांमध्ये प्रचंड नाराजी होती. लोकार्पण न करता पाणी सोडा अशी मागणी त्यांच्याकडून होत होती. अखेर ही बाब लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी लोकार्पणाची वाट न पाहता पाणी सोडावे असे आदेश दिले होते. यानुसार एमएमआरडीएने दिवाळीपासून (११ नोव्हेंबर) या प्रकल्पातील पाणी सोडण्यास सुरुवात केल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 185 million liters water from of surya dam for vasai virar decision by mmrda zws