मुंबई : करोना रुग्णांची संख्या मुंबईत कमी होत असून, रविवारी १८७ नव्या रुग्णांची नोंद झाली. उपचाराधीन रुग्णांची संख्याही कमी होत असून ही संख्या १ हजार ७११ आहे. १८७ नव्या रुग्णांपैकी ९३ टक्के जणांना कोणतीही लक्षणे नाहीत, तर १३ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. ४ रुग्णांना प्राणवायू द्यावा लागला. सध्या २१६ करोनाबाधित रुग्णालयात दाखल असून प्राणवायू खाटांवर १२ रुग्ण आहेत. दिवसभरात ३७५ रुग्ण करोनामुक्त झाले. करोनामुक्त रुग्णांचे प्रमाण वाढले असून ९८ टक्के आहे.
आतापर्यंत बाधित झालेल्यांची संख्या ११ लाख ४७ हजार झाली, तर रुग्णवाढीचा दर वाढत असून ०.०२ टक्के झाला. रुग्णदुपटीचा कालावधी वाढला असून तीन हजार दिवसांवर आला आहे. रविवारी एका रुग्णाचा मृत्यू झाला. हा रुग्ण ७१ वर्षीय पुरुष होता. त्याला रक्तदाब आणि मधुमेह असे आजार होते.
ठाणे जिल्ह्यात १०३ जणांना संसर्ग
ठाणे : जिल्ह्यात रविवारी करोनाचे १०३ रुग्ण आढळले. या रुग्णांपैकी नवी मुंबई ४२, ठाणे ३६, कल्याण-डोंबिवली १५, ठाणे ग्रामीण चार, उल्हासनगर आणि मीरा भाईंदरमध्ये प्रत्येकी तीन रुग्ण आढळला. सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार ३५१ आहे.