मुंबई: महामार्गांवर वाहनांच्या अतिवेगामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते. तसेच गेल्या काही वर्षात वेग मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहने चालवण्याने अपघात होण्याचे प्रमाण अधिक आहे. वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी, रस्ते सुरक्षा नियमांचे पालन आणि रस्ते सुरक्षा वाढविण्याच्या उद्देशाने राज्यभरातील प्रत्येक आरटीओमध्ये प्रत्येकी दोन ते सहा असे एकूण १८७ स्पीडगन इंटरसेप्टर वाहने तैनात केली जाणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘पुढे अपघाती वळण रस्ता आहे, वाहने सावकाश चालावा’, ‘वेगमर्यादा ८०’, अशा आशयाचे वेगवेगळे सूचना फलक महामार्गावर लावले जातात. मात्र वाहनचालक या फलकांकडे दुर्लक्ष करून बेफामपणे वाहने चालवून स्वतः किंवा दुसऱ्याचा जीव धोक्यात घालतात. वेगमर्यादेचे उल्लंघन करून वाहने चालवण्यावर आरटीओ, महामार्ग पोलिसांद्वारे कारवाईचा बडगा सुरू असतो. तर स्पीडगन कॅमेऱ्यांद्वारे हेरून वाहनांवर कारवाई केली जाते. परंतु, ज्या ठिकाणी स्पीडगन कॅमेरे लावले आहेत, तिथे चालक सतर्क राहून वाहनांचा वेग कमी करतात. त्यानंतर पुन्हा वेग वाढवून नियम धाब्यावर बसवतात. त्यामुळे राज्य परिवहन विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांतील वायूवेग पथकांसाठी अत्याधुनिक अशा १८७ इंटरसेप्टर वाहनांची खरेदी केली आहे. त्यासाठी सुमारे ५८ कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत. परिणामी, कोणत्याही वेळी महामार्गावर स्पीडगन इंटरसेप्टर वाहने तैनात करणे शक्य आहे. त्यामुळे कॅमेरे चुकवून वार्‍याच्या वेगाने वाहने चालवणाऱ्यांना रोखणे शक्य होणार आहे.

हेही वाचा… मार्ड विरूद्ध मार्ड; बीएमसी मार्डच्या संपाला केंद्रीय ‘मार्ड’चा विरोध; बंधपत्रित जागा केंद्रीय समुपदेशन फेरीने भरण्यास मार्डचा पाठिंबा

ज्या ठिकाणी स्पीडगन इंटरसेप्टर वाहने तैनात केली जातील, तेथून निधारित वेग मर्यादेपेक्षा जास्त वेगाने धावणार्‍या वाहनांची माहिती तत्काळ नियंत्रण कक्षाला मिळणार असून त्या वाहनाला दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे वाहतूक नियमांची अंमलबजावणी होण्यास आणि रस्ते सुरक्षेत वाढ होणार आहे, असे आरटीओच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

स्पीडगन इंटरसेप्टर वाहनात लेझर कॅमेरा, मद्य श्वास विश्लेषक व इतर आवश्यक उपकरणे आहेत. या वाहनांची नोंदणी झाली असून ही वाहने कार्यरत झाली आहेत. परिवहन आयुक्त कार्यालयात दोन, ताडदेव आरटीओत चार, अंधेरी, बोरिवली आणि वडाळा आरटीओमध्ये प्रत्येकी चार स्पीडगन इंटरसेप्टर वाहने तैनात केली जाणार आहेत. नाशिक, जळगाव आरटीओमध्ये सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी सहा स्पीडगन इंटरसेप्टर वाहने उपलब्ध असणार आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 187 speedgun interceptor vehicles deployed on highways by rto in maharashtra mumbai print news dvr
Show comments