लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या असून अनेक जण गावी अथवा पर्यटनासाठी जात आहेत. मात्र नियमित रेल्वेगाड्यांचे आरक्षित तिकीट मिळणे अवघड होते. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वे विभागात सर्वाधिक म्हणजे १,८७८ आणि मध्य रेल्वे विभागात ४८८ उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या चालविल्या. प्रवाशांना आरामदायी आणि सुरळीत प्रवास व्हावा या उद्देशाने या विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

उन्हाळ्याची सुट्टी, लग्नसराईनिमित्त कुटुंबियांसह बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. त्यामुळे नियमित रेल्वगाड्यांमधील प्रवाशांच्या गर्दीचे विभाजन करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून अतिरिक्त विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येतात. यंदा उन्हाळ्यात भारतीय रेल्वेने विक्रमी संख्येने अतिरिक्त रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या सोडल्या आहेत. या उन्हाळी सुट्ट्यांच्या हंगामात प्रवाशांच्या सुविधेसाठी भारतीय रेल्वेच्या अतिरिक्त ९,१११ फेऱ्या धावल्या. २०२३ साली उन्हाळी हंगामात एकूण ६,३६९ फेऱ्या रेल्वेकडून चालवण्यात आल्या होत्या. यावर्षी या फेऱ्यांमध्ये २,७४२ फेऱ्यांची वाढ करून प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यासाठी भारतीय रेल्वेने प्रयत्न केला आहे.

आणखी वाचा-मुंबई : पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक

प्रमुख रेल्वे मार्गावर विनाअडथळा प्रवासाची सोय उपलब्ध करून देत देशभरातील प्रमुख स्थानकांना जोडण्यासाठी अतिरिक्त रेल्वेगाड्यांचे नियोजन करण्यात आले. यामध्ये तमिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, ओरिसा, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि दिल्ली यांसारख्या राज्यात उन्हाळी सुट्ट्यांदरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेच्या अतिरिक्त फेऱ्या चालविण्यात आल्या. यात पश्चिम रेल्वे प्रशासन सर्वात अग्रेसर आहे. पश्चिम रेल्वेने १,८७८, उत्तर पश्चिम रेल्वेने १,६२३ आणि दक्षिण मध्य रेल्वेने १,०१२ आणि मध्य रेल्वेने ४८८ उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या चालवल्या.

रेल्वे स्थानकात आणि रेल्वे परिसरात प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढल्याने चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती टाळण्यासाठी रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाचे विशेष तपासणी पथक पादचारी पूल, फलाट यावर तैनात आहेत. तसेच प्रवाशांना १३९ हा मदतवाहिनी क्रमांक उपलब्ध करण्यात आला आहे.

आणखी वाचा-राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ३,३३४ मुलांवर हृदय शस्त्रक्रिया! दोन कोटी बालकांची आरोग्य तपासणी…

विभागानुसार उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या

  • पश्चिम रेल्वे – १,८७८
  • उत्तर पश्चिम रेल्वे – १,६२३
  • दक्षिण मध्य रेल्वे – १,०१२
  • पूर्व मध्य रेल्वे – १,००३
  • दक्षिण पश्चिम रेल्वे – ८१०
  • उत्तर रेल्वे – ७७८
  • मध्य रेल्वे – ४८८
  • दक्षिण पूर्व रेल्वे – २७६
  • पूर्व रेल्वे – २५४
  • उत्तर पूर्व रेल्वे – २४४
  • दक्षिण रेल्वे – २३९
  • पश्चिम मध्य रेल्वे – १६२
  • उत्तर मध्य रेल्वे – १४२
  • पूर्व कोस्ट रेल्वे – १०२
  • ईशान्य फ्रंटियर रेल्वे झोन – ८८
  • दक्षिण पूर्व मध्य रेल्वे – १२
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1878 summer special trains from western railway and 488 from central railway mumbai print news mrj