मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गिकेच्या कामांसाठी २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात १९ हजार ५९२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात बुलेट ट्रेनसाठी पाच हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यावेळी निधीत मोठी वाढ केली आहे. पहिल्या टप्प्यात सुरत – बिलिमोरा मार्गावर २०२६ किंवा २०२७ मध्ये पहिली बुलेट ट्रेन चालवण्याचे उदि्दष्ट आहे.
हेही वाचा >>> राज्यातील सर्व शाळांमध्ये साजरा होणार आजी आजोबा दिवस; शासनाकडून परिपत्रक जारी
मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गिकेसाठी गुजरातचे ९८.९१ टक्के भूसंपादन झाले असून दादरा-नगर हवेलीमध्ये १०० टक्के जमीन संपादित झाली आहे. गुजरातमध्ये तर गर्डर आणि मार्गिका उभारणीच्या कामालाही गती देण्यात आली आहे. राज्यात बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी लागणाऱ्या ४३०.४५ हेक्टर जमिनीपैकी ४२५.२४ हेक्टरहून अधिक जमीन संपादित करण्यात आली असून राज्यात सरासरी ९८.७९ टक्के भूसंपादन झाले आहे.
बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती मिळावी यासाठी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात १९ हजार ५९२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनकडून देण्यात आली. या निधीमुळे गुजरातमधील प्रत्यक्ष सुरू असलेले काम, तसेच राज्यातील भूसंपादन अन्य कामे वेगाने होण्यास मदत मिळणार आहे.
हेही वाचा >>> मुंबई: म्हाडा दुरुस्ती मंडळात बनावट वितरण! पायधुनी पोलिसांकडून चौकशी सुरू
मुंबईतही गती
मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील सुरुवातीचे स्थानक असलेल्या वांद्रे – कुर्ला संकुल स्थानकाच्या बांधकामासाठी बड्या कंपन्या इच्छुक आहेत. स्थानकाचा आराखडा व बांधकामासाठी नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून आर्थिक निविदा (टेकनिकल बिड) उघडण्यात आल्या आहेत. वांद्रे कुर्ला संकुल-शिळफाटा या २१ किलोमीटर भुयारी मार्गासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तसेच बुलेट ट्रेनच्या गाड्यांची देखभाल – दुरुस्ती, तसेच त्या उभ्या करण्यासाठी एक मोठे आगार ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात उभारण्यात येणार असून यासाठीचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. आगाराच्या बांधकामासाठी २२ डिसेंबर २०२२ रोजी निविदा काढण्यात आली होती. २७ एप्रिल २०२३ ला निविदा उघडण्यात येणार आहेत.