विकास महाडिक, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई: राज्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या रस्ते अपघाताला काही प्रमाणात आळा बसावा यासाठी प्रगत देशांच्या धर्तीवर नवीन वाहन चालक परवाना मिळविताना १९ प्रकारचे निकष पूर्ण करावे लागणार आहेत. राज्याच्या परिवहन विभागाच्या वतीने यासाठी १७ ठिकाणी स्वयंचलित वाहन परवाना तपासणी मार्ग तयार केले जात असून २३ ठिकाणी वाहन योग्यता प्रमाणपत्र केंद्रे उभारली जात आहेत.

हेही वाचा >>> गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटात सहाजण जखमी; कराडमध्ये एकच खळबळ

येत्या दोन महिन्यांत हे स्वयंचलित परवाना तपासणी मार्ग व केंद्रे सुरू केली जाण्याची शक्यता आहे अशी माहिती परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटिया यांनी दिली. राज्यात रस्ते अपघातात १५ हजारापेक्षा जास्त चालकांचा मूत्यू होत आहे ही चिंतेची बाब ठरली आहे. केंद्रीय रस्ते व परिहवन मंत्रालयाने गेल्या वर्षी सर्व प्रकारचे वाहन चालक परवाना देताना नियमात बदल केले आहेत. नवीन  परवाना घेणाऱ्या चालकाने ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर त्याला देण्यात आलेल्या वेळेनुसार चाचणी द्यावी लागत आहे.  राज्य सरकारच्या परिवहन विभागाने ३५ वर्षांनंतर वाहन परवाना देण्याच्या प्रक्रियेत बदल केला आहे. केवळ वाहन चालवता येत आहे हा निकष वाहन परवाना देण्यासाठी पुरेसा नाही. वाहन परवाना देण्यात  परिवहन विभागाचा कोणताही हस्तक्षेप राहणार नाही अशी प्रणाली या नवीन स्वयंचलित वाहन परवाना पद्धतीत अवलंबली जाणार आहे.

१९ नियम परिवहन विभागाने तयार केले आहेत. यापूर्वीच्या चाचणीत परिवहन निरीक्षकाचा (आरटीओ अधिकारी) शेरा हा परवाना मिळविण्यात महत्त्वाची भूमिका बजावत होता.  या चाचणीत मानवी हस्तक्षेप पूर्णपणे टाळला जाणार असल्याचे परिवहनचे प्रधान सचिव जैन यांनी सांगितले.

‘आधार’शी जोडणी

* नवीन नियमानुसार वाहन परवाना देताना गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जाणार आहे.  वाहन परवाना आधार कार्डशी जोडला जाणार आहे. * ऑनलाइन अर्ज केल्यानंतर स्वयंचलित मार्ग (ऑटोमेटेड टेस्ट) वेळ दिली जाणार आहे. या ऑटोमेटेड टेस्टच्या जागी सेंसर लावले जाणार असून सीसी टीव्ही कॅमेरांच्या देखरेखीत ही चाचणी होणार आहे. कमीत कमी २९ तासांचे वाहन प्रशिक्षण पूर्ण करावे लागणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 19 types of criteria have to be fulfilled while getting new driving license in maharashtra zws