गेल्या वर्षभरात ७२ हजार जणांना कुत्र्यांचा चावा; निर्बिजीकरण मोहिमेनंतरही भटक्या कुत्र्यांचा उपद्रव सुरूच

शैलजा तिवले, मुंबई</strong>

निर्बीजीकरणाच्या मोहिमेनंतरही मुंबईतील भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यात मुंबई महापालिकेला अपयश आले असून त्याचा परिणाम मुंबईतील श्वानदंशाच्या घटना वाढण्यात झाला आहे. गेल्या वर्षभरात जवळपास ७२ हजार व्यक्तींना कुत्रा चावल्याच्या घटना घडल्या आहेत. तर एप्रिल २०१८ ते जानेवारी २०१९ या काळात शहरात जवळपास ५८ हजार श्वानदंशाच्या घटनांची नोंद झाली आहे. थोडक्यात दर दिवशी १९० मुंबईकरांना श्वानदंशाच्या समस्येला सामोरे जावे लागते.

देवनार परिसरात गेल्या महिनाभरापासून भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या हल्ल्यात दहा ते बारा जण जखमी झाले होते. पिसाळलेल्या कुत्र्यांकडून मुंबईकरांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या वाढत्या संख्येनंतर शहरातील कुत्र्यांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी निर्बीजीकरणाचा उपाय अमलात आणला. मात्र त्यानंतरही हा प्रश्न सुटलेला नाही.

कुत्रा चावल्यानंतर रेबीज प्रतिबंधाची लस तातडीने घ्यायची असल्याने अनेकदा घराजवळ उपलब्ध असलेल्या खासगी दवाखान्यातून घेतली जाते. त्यामुळे पालिका रुग्णालय वगळता खासगी रुग्णालयात होणाऱ्या उपचारांची पर्यायाने श्वानदंशाची नोंद होत नाही. त्यामुळे प्रत्यक्षात ही आकडेवारी अधिकच असण्याची शक्यता आहे.

भटक्या श्वानांची पुन्हा गणना

शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी मुंबईत सहा केंद्र कार्यरत आहेत. या केंद्राच्या मार्फत कुत्र्याचे निर्बीजीकरण करण्याच्या कार्यक्रमावर भर दिला जातो. या कार्यक्रमामुळे निश्चितच शहरातील कुत्र्यांच्या संख्या नियंत्रणात ठेवणे शक्य होत आहे. पाच वर्षांनंतर आता यावर्षी पुन्हा भटक्या कुत्र्यांच्या गणना सुरू झाली आहे. या गणनेनंतरच शहरातील कुत्र्यांच्या संख्येबाबत खरे चित्र स्पष्ट होईल, असे देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. योगेश शेटय़े यांनी सांगितले.

लसीची चणचण?

’ श्वानदंशाच्या लसीचा पालिका रुग्णालयात तुटवडा असल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणासाठी जावे लागत असल्याचे गेल्या महिन्यात निदर्शनास आले होते.

’ श्वानदंशाच्या लसीकरणाची निर्मिती करणाऱ्या मोजक्याच कंपन्या आहेत. त्यात पालिकेला या लसचा पुरवठा एकाच कंपनीकडून केला जातो. या लसची तपासणी केंद्रीय प्रयोगशाळेत केली जात असल्याने तेथे काही तांत्रिक कारणास्तव उशीर झाला तर पुरवठा होण्यास वेळ लागतो.

’ रेबीज प्रतिबंध लसीचा पुरवठा कमी पडू नये यासाठी ४० ते ४५ दिवस आधीच पुरवठादाराकडे मागणी केली जाते. कंपनीने पुरवठा वेळेत न केल्यास दिवसाप्रमाणे दंडही आकारण्यात येत असल्याचे पालिकेचे साहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रशेखर चिपळूणकर यांनी सांगितले.

श्वानदंशाची आकडेवारी

वर्ष                  घटना

२०१५-१६       ८०,३९४

१६ -१७          ८२,५४६

१७-१८            ७२,४७०

१८ -१९ (एप्रिल ते जाने) ५८,१४२

शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या कमी होत आहे. मात्र, श्वानदंशाच्या घटनांची नोंद करताना कुत्रा चावण्याच्या कारणांचीही नोंद होणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ चालताना पाय पडल्याने किंवा रस्त्यावरील कुत्र्यांच्या भांडणांनंतर कुत्रा चावला. या नोंदीमुळे घटनांमधून विश्लेषण करणे शक्य होईल.

– सुनीश कुंजू, मानद वन्यजीवरक्षक

Story img Loader