‘रूळ ओलांडणे धोक्याचे ठरू शकते’, ‘रूळ ओलांडणे हा कायद्याने गुन्हा आहे’, अशी उद््घोषणा रेल्वेतर्फे वारंवार स्थानकांवर करण्यात येत असते. मात्र प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करतात आणि रूळ ओलांडण्याच्या प्रयत्नात लोकल अथवा मेल-एक्स्प्रेसची धडक लागल्याने त्यांना जीव गमवावा लागतो. २०२१ पासून आतापर्यंत अशा अपघातांत एक हजार ९६२ प्रवाशांना प्राण गमवावे लागले आहेत, तर ३२४ जण जखमी झाल्याची माहिती माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली. या अपघातांना रेल्वे प्रवाशांचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरतोच, शिवाय रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांना रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे प्रशासन अपयशी ठरत असल्याचे उघड झाले आहे.
रूळ ओलांडताना अपघात होऊ नये यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळ, मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून विविध उपाययोजना करण्यात येतात. स्थानकात, तसेच दोन स्थानकांदरम्यान रूळ ओलांडण्याचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशी स्थानके शोधून दोन रुळांच्या मध्ये कुंपण घालणे, रुळांच्या बाजूला सरंक्षक भिंत बांधणे यासह नवीन पादचारीपूल बांधणे आदी उपाययोजना करण्यात येतात. रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे सुरक्षा दलामार्फत कारवाई करण्यात येते. मात्र कारवाई आणि उपाययोजना अपुऱ्या ठरत आहेत. प्रवासीही निष्काळजीपणाने जीव धोक्यात घालून रूळ ओलांडत आहेत.
हेही वाचा : नवी मुंबई पालिकेच्या परिवहन सेवेच्या बसमधून गॅस गळती; सुदैवाने जीवित हानी नाही
लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रूळ ओलांडताना लोकल आणि मेल एक्स्प्रेसची धडक लागून २०२१ आणि २०२२ मध्ये एकूण एक हजार ९६३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २०२१ मध्ये एक हजार ११४ जणांचा मृत्यू आणि १७६ जण जखमी झाले आहेत. तर २०२२ मध्ये ८४८ जणांचा मृत्यू आणि १४८ जण जखमी झाले आहेत. २०२२ मध्ये रूळ ओलांडताना सार्वधिक मृत्यूची नोंद बोरिवली लोहमार्ग हद्दीत झाली असून १०१ जणांच्या, तर ठाणे लोहमार्ग हद्दीत १०७ जणांच्या मृत्युची नोंद झाली आहे. त्यानंतर कल्याण, कुर्ला, पालघर, अंधेरी लोहमार्ग पोलीस हद्दीतही मोठ्या प्रमाणात अपघात झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. रूळ ओलांडणाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण अधिक असून असून ७५९ जणांचा मृत्यू झाला आहे.
रूळ ओलांडताना होणारे अपघात रोखण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (‘एमआरव्हीसी’) मध्य आणि पश्चिम उपनगरीय मार्गांवरील १५ उपनगरीय स्थानकात १७ पादचारीपूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ऑगस्ट २०२३ पर्यंत या पुलांची उभारणी होईल. यापैकी १३ पूल मध्य रेल्वेवर, तर उर्वरित चार पूल पश्चिम रेल्वेवर उभारण्यात येणार आहेत. हे अपघात रोखण्यासाठी एमआरव्हीसी, मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.
स्थानकात, तसेच दोन स्थानकांदरम्यान पादचारीपूल, पादचारी मार्गिका, भुयारी मार्ग उपलब्ध करण्याचे नियोजन केले जाते. प्रत्यक्ष स्थानकातही रुळ ओलांडण्याचे प्रमाण अधिक आहे. अशी ठिकाणे शोधून एमआरव्हीसीने गेल्या पाच ते सहा वर्षांत मध्य आणि पश्चिम रेल्वेवर एकूण १४ पादचारीपूल उभारले. तर ठाणे – दिवा पाचव्या – सहाव्या मार्गितेलक नवे सहा पादचारीपूल, हार्बरवरील अंधेरीचा गोरेगावपर्यंत विस्तार करताना दोन पादचारीपुलांची उभारणी केली आहे. याशिवाय दोन स्थानकांदरम्यानही प्रवासी रुळ ओलांडत असून अशा ठिकाणीही एमआरव्हीसीने मध्य रेल्वेवर १६ पैकी आठ, पश्चिम रेल्वेवर सहापैकी पाच पूल उभारले आहेत.