मुंबई : मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्यात दोषी ठरवण्यात आलेला गुंड अबू सालेम याने शिक्षामाफीसाठी आणि तुरूंगातून सुटका करण्याच्या मागमीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. भारत आणि पोर्तुगाल यांच्यात आपल्या प्रत्यार्पणाबाबत झालेल्या करारानुसार आपण २५ वर्षांचा तुरुंगवास पूर्ण केल्यामुळे, आपली तुरुंगातून सुटका करण्यात यावी, अशी मागणी सालेम याने याचिकेद्वारे केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सालेम याचा याबाबतचा अर्ज विशेष टाडा न्यायालयाने १० डिसेंबर रोजी फेटाळला होता. त्याविरोधात सालेम याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठापुढे सालेम याच्या याचिकेवर सुनावणी झाली. त्याची दखल घेऊन न्यायालयाने याचिका १० मार्च रोजी सुनावणीसाठी ठेवली.

एकूण शिक्षा, कच्चा कैदी म्हणून घालवलेला कालावधी आणि मिळवलेल्या माफीचा समावेश हा कार्यकाळ २५ वर्षांपेक्षा जास्त असल्याचा दावा सालेमने याचिकेत केला आहे. त्याच्या याचिकेनुसार, २४ डिसेंबर २०२४ पर्यंत, त्याने दोन प्रकरणांमध्ये झालेली एकूण शिक्षा म्हणून म्हणून २५ वर्षांहून अधिकचा तुरुंगवास भोगला आहे. नोव्हेंबर २००५ ते सप्टेंबर २०१७ पर्यंत त्याने खटला निकाली निघेपर्यंत ११ वर्षे ९ महिने आणि २६ दिवस तुरूंगात काढली. तर फेब्रुवारी २०१५ ते डिसेंबर २०२४ दरम्यान २००६ च्या टाडा प्रकरणात दोषी म्हणून नऊ वर्षे १० महिने आणि ४ दिवस तुरूंगात घातवले आहे. याशिवाय, २००६ च्या प्रकरणात चांगल्या वर्तनासाठी त्याला तीन वर्षे १६ दिवसांची माफी मिळाली आहे.

पोर्तुगालमध्ये खटल्यात घालवलेल्या कालावधीसाठी सर्वोच्च न्यायालयाने आणखी एक महिन्याची सूट दिल्याचेही सालेम याने याचिकेत म्हटले आहे. तसेच, उपरोक्त कालावधीची बेरीज केल्यास २०२४ च्या अखेरीस, त्याने एकूण २४ वर्षे ९ महिन्यांहून अधिक काळ तुरुंगवास भोगल्याचा दावा केला आहे. याशिवाय, पोर्तुगालमधून त्याच्या प्रत्यार्पणादरम्यान दिलेल्या आश्वासनांचे उल्लंघन झाल्याचा दावाही सालेम याने याचिकेत केला आहे. तसेच शिक्षा पूर्ण भोगल्यानंतरही तुरुंगात ठेवणे हे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २१ अन्वये वैयक्तिक स्वातंत्र्याच्या अधिकाराचे उल्लंघन असल्याचा दावा देखील केला आहे.