अवघ्या १० दिवसांपूर्वी कामावर ठेवलेल्या नोकराने दुकानातील सुमारे अडीच कोटी रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याची घटना जोगेश्वरी येथे घडली आहे. पोलीस फरारी असलेला नोकर कमलेश चौधरी याचा शोध घेत आहेत.  
जोगेश्वरी पूर्वेच्या गुंफा रोडवरील सॅटेलाइट इमारतीसमोर लालचंद पन्नालाल जैन (६०) यांचे अंबिका ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. दर सोमवारी त्यांचे दुकान बंद असते. सोमवारी दुपारी त्यांच्या दुकानात नव्याने ठेवलेला नोकर कमलेश चौधरी दुकानाच्या जवळच रहात असलेल्या पन्नालाल जैन यांच्या घरी आला. मुलाने दुकानाची चावी मागितली आहे, असे त्याने सांगितले. त्यांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत चावी दिली. कमलेशने मग दुकानात जाऊन आरामात दुकानात ठेवलेले १० किलो सोन्याचे दागिने तसेच सव्वा लाख रोख रक्कम असा एकूण २ कोटी ४१ लाख रुपयांचा ऐवज घेऊन पळ काढला. जैन यांचा मुलगा घरी आला तेव्हा कमलेश चावी घेऊन गेल्याचे समजले. तोपर्यंत कमलेशने दुकान साफ केले होते. कमलेश हा मूळ राजस्थानातील आहे. जैन यांच्या एका मित्राच्या ओळखीने अवघ्या १० दिवसांपूर्वी तो कामाला लागला होता. त्याच्याकडून त्याच्या वैयक्तिक माहितीचे कागदपत्र जैन यांनी मागितले होते. मात्र तो टाळाटाळ करीत होता. आता त्याचा फोटो मिळाला असून शोध सुरू असल्याचे जोगेश्वरी पोलिसांनी सांगितले.

Story img Loader