राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाडय़ांसाठी वापरण्यात येणारे टायर निकृष्ट दर्जाचे असल्याचा टाहो महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आणि कर्मचारी संघटनांनी अनेकदा फोडूनही कोणतीही कार्यवाही न झालेल्या एसटी प्रशासनाला या निकृष्ट टायर्समुळेच बुधवारी मोठा हादरा बसला आहे. बुधवारी सकाळी परतवाडा-अमरावती या मार्गावर धावणाऱ्या एका एसटीचा पुढील टायर अचानक फुटल्याने ही बस झाडावर आदळली. राज्य महामार्ग क्रमांक सहावर झालेल्या या अपघातात चालक आणि एक प्रवासी महिला जागीच मृत्युमुखी पडले. तर तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर तरी निकृष्ट टायर्सच्या प्रश्नाकडे राज्य परिवहन महामंडळ गांभीर्याने बघेल, असा अंदाज कर्मचारी संघटनांकडून व्यक्त केला जात आहे.
परतवाडा-अमरावती या मार्गावरून जाणारी एमएच-१२-सीएफ-७५४३ ही गाडी सकाळी ११ वाजता आसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असताना मेघनाथपूर शिवार येथे या गाडीचा पुढील टायर अचानक फुटला. गाडी बऱ्यापैकी वेगात असल्याने चालकाला गाडीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले नाही आणि ही गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. या अपघातात गाडीचा चालक दीपक बसवनाके जागीच ठार झाला. तर गाडीतील कंचन राघानी (२५) या महिलेचाही मृत्यू झाला. तर गाडीतील इतर तीन प्रवासी जखमी झाले.
एसटी महामंडळाकडे सध्या टायर्सचा तुटवडा असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झाले होते. याबाबत महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेने वेळोवेळी आवाजही उठवला होता. टायर्स दुरुस्त करण्यासाठी वापरण्यात येणारे व्हॅसलिनही निकृष्ट दर्जाचे असल्याचे कामगार संघटनेने सप्रमाण सिद्ध केले होते. एसटीचे टायर्स ५० हजार किलोमीटपर्यंत चालणे अपेक्षित असताना हे टायर्स २५ ते ३५ हजार किलोमीटरमध्येच बाद होत होते. रत्नागिरी, यवतमाळ आदी आगारांत तर टायर्स नसल्याने बसफेऱ्याही रद्द कराव्या लागल्याच्या घटना कर्मचारी संघटनेने प्रशासनासमोर आणल्या होत्या. मात्र, या सर्व तक्रारींकडे प्रशासनाने आतापर्यंत फारसे लक्ष दिले नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा