मुंबई : परेल बस डेपोमगील सयानी मार्गावर मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास वृक्ष उन्मळून पडला. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला. मुंबईत सलग दुसऱ्या दिवस झाड पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वरळीतील जांबोरी मैदानानजिकच्या चौकात सोमवारी झाड पडून एकाचा मृत्यू झाला होता. दरम्यान, वृक्ष उन्मळून पडून त्याखाली दोघांचा मृत्यू झाल्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने पावसाळापूर्व कामाचा भाग म्हणून केलेल्या वृक्ष छाटणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हेही वाचा >>> मुंबई: अत्याचाराप्रकरणी कीक बॉक्सिंग प्रशिक्षकाला अटक
परेल बस डेपोमागील सयानी मार्गावरील एक मोठा वृक्ष मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास उन्मळून पडला. परिसरात कचरा वेचणाऱ्या वर्षा कांतीलाल मेस्त्री यांच्या अंगावर हा वृक्ष पडला. या परिसरातील नागरिकांनी प्रसंगावधान दाखवून पडलेल्या महिलेला झाडाखालून बाहेर काढले. तसेच, उपचारासाठी तात्काळ नजीकच्या केईएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दक्षिण मुंबईत सलग दोन दिवस वेगवेगळ्या ठिकाणी झाड पडून दोघांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सोमवारी वरळीमधील बीडीडी चाळ क्रमांक – ८९ येथे जांबोरी मैदानानजिक झाड पडून अमित जगताप हे गंभीर जखमी झाले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना झाडाखालून बाहेर काढले आणि तात्काळ नजिकच्या ग्लोबल रूग्णालयात नेले. रुग्णालयात उपचार सुरू असताना जगताप यांचा सोमवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास मृत्यू झाला.
हेही वाचा >>> मुंबई : नव्या इमारतींची आयआयटीकडून तपासणी, ताबा घेतलेल्या म्हाडाच्या २०७ पैकी ९६ घरांमध्ये बदल
मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात झाडे, फांद्या पडून नागरिकांचा बळी जातो. गतवर्षीही काही जणांना अशा दुर्घटनांमध्ये प्राण गमवावे लागले होते. अशा दुर्घटनांना आळा बसावा यासाठी महानगरपालिकेतर्फे झाडांची छाटणी करण्यात येते. यंदाही पावसाळापूर्व कामांदरम्यान मोठ्या आणि धोकादायक झाडांच्या फांद्यांची सुयोग्य आणि शास्त्रीय पद्धतीने छाटणी करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने मुंबई शहर व उपनगरतील हजारो झाडांची छाटणी पूर्ण केली. रेल्वे परिसरातील झाडांच्या छाटणीचेही काम महानगरपालिकेने हाती घेतले होते. तसेच, खाजगी इमारतीच्या आवारातील वृक्ष छाटणीसाठी संबंधित महानगरपालिका विभाग कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहनही महानगरपालिकेतर्फे सातत्याने केले जात होते. मात्र, विविध उपाययोजना करूनही यंदा अनेक ठिकाणी झाड, फांद्या पडण्याच्या घटना घडत आहेत. मुंबईत जेमतेम पाऊस असतानाच घडणाऱ्या अशा दुर्घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.