मुंबई : अकरावीची पहिली प्रवेश यादी बुधवारी जाहीर होणार असून यंदाही मुंबई विभागातील अनेक महाविद्यालयांमध्ये जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. अकरावी ऑनलाइन केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठीच्या असलेल्या २ लाख ३० हजार ९४५ जागांसाठी २ लाख ४७ हजार ९०७ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरून अर्ज अंतिम केले आहेत. दरम्यान, १४ हजार २२६ विद्यार्थ्यांनी विविध कोटय़ांतून प्रवेश निश्चित केले आहेत.
राज्य मंडळाचा निकाल जाहीर झाल्यापासून प्रतीक्षेत असलेली अकरावी प्रवेशाची पहिली यादी अखेर बुधवारी जाहीर होणार आहे. यंदा मुंबई महानगर प्रदेशात अकरावीच्या एकूण ३ लाख ५७ हजार ९ जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी २ लाख ३० हजार ९४५ जागा केंद्रीय फेरीसाठी, तर १ लाख ४० हजार २९० जागा विविध कोटय़ांतील प्रवेशासाठी राखीव आहेत. यासाठी केंद्रीय प्रवेश फेरीसाठी २ लाख ४७ हजार ९०७ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरून अर्ज अंतिम केले आहेत.
यंदा ३ लाख ८ हजार ७२ विद्यार्थ्यांनी अर्जाचा पहिला भाग भरला होता. त्यातील २ लाख ४७ हजार विद्यार्थ्यांनी अर्जाचा दुसरा भाग भरून अर्ज अंतिम केला आहे. विविध कोटय़ांतील प्रवेशासाठी ४१ हजार ९५५ विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. या विद्यार्थ्यांची पहिली प्रवेश यादी बुधवारी जाहीर होणार असून त्यानंतर मिळालेल्या महाविद्यालयांत प्रवेश निश्चित करण्यासाठी तीन दिवस मिळणार आहेत.
जागा रिक्त राहणार?
गेल्यावर्षी दहावीचा निकाल शंभर टक्के जाहीर झाल्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयांना गेली काही वर्षे प्रवेश क्षमता वाढवून देण्यात आली आहे. यंदाही दहावीचा निकाल वाढला असला तरी प्रवेश प्रक्रिया लांबली. त्याचबरोबर अकरावी व्यतिरिक्त व्यवसाय प्रशिक्षण, पदविका अभ्यासक्रमांकडेही विद्यार्थ्यांचा ओढा वाढताना दिसतो आहे. त्यामुळे यंदा उपलब्ध जागांच्या तुलनेत विद्यार्थ्यांचे अर्जही कमी असल्याचे दिसते आहे. त्यामुळे मुंबई महानगर परिसरात अकरावीच्या लाखभर जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.
नॉन क्रिमिलेअर देण्यासाठी तीन महिन्यांची मुदत
अनेक विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलेअर दाखला मिळवण्यासाठी अडचणी येत आहेत. अशा विद्यार्थ्यांकडून हमीपत्र भरून घेण्यात येणार असून त्यांना दाखला सादर करण्यासाठी तीन महिन्यांचा अवधी मिळणार आहे.