उपनगरीय रेल्वेच्या खालोखाल तमाम मुंबईकरांचा प्रवास ‘सुखद’ करणाऱ्या ‘बेस्ट’ उपक्रमाचा परिवहन विभाग कमालीचा तोटय़ात आहे, ही गोष्ट आता काही नवीन नाही. मात्र ‘बेस्ट’च्या एकूण ५१५ मार्गापैकी फक्त दोनच मार्ग फायद्यात चालत आहेत. तर उर्वरित ५१३ मार्गापैकी ३२६ मार्ग पूर्णपणे तोटय़ात आहेत. हे तोटय़ातले बसमार्ग किमान ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावरही चालवण्यात ‘बेस्ट’ प्रशासनाला सातत्याने अपयश येत आहे.
दक्षिणोत्तर वाढ झालेल्या मुंबईच्या उपनगरांमध्ये आणि आता ठाणे व नवी मुंबई या शहरांतही ‘बेस्ट’च्या बसेस धावत असतात. ५१५ मार्गासाठी ‘बेस्ट’च्या ताफ्यात ४२०० बसगाडय़ा आहेत. या ५१५ मार्गावर रोज सुमारे ४० लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र तरीही ‘बेस्ट’च्या या ५१५ मार्गापैकी ३२६ मार्ग तोटय़ात आहेत. तर फक्त १८७ मार्ग हे ‘ना नफा ना तोटा’ या धोरणाप्रमाणे जेमतेम गुंतवणुकीएवढेच उत्पन्न मिळवून देत आहेत.
यातील गंभीर बाब म्हणजे एवढय़ा ५१५ मार्गापैकी फक्त ४१५ आणि १६९ हे दोनच मार्ग ‘बेस्ट’ला फायदा मिळवून देतात. ४१५ क्रमांकाची बस अंधेरी पूर्व आगरकर चौक येथून सिप्झला जाते. तर १६९ क्रमांकाची बस प्रतीक्षा नगर ते वरळी गाव या मार्गावर धावते. या दोन्ही मार्गावर दिवसाच्या कोणत्याही वेळेला दोन्ही बाजूंनी प्रवाशांची वर्दळ असते. म्हणूनच हे मार्ग फायद्यात आहेत. मात्र ‘बेस्ट’च्या इतर कोणत्याही मार्गाबाबत असे सांगता येत नाही.
कसे ठरतात फायद्यातील मार्ग?
एखाद्या मार्गाचे फायद्या-तोटय़ाचे गणित मांडताना प्रत्येक बसगाडीवर येणारा खर्च गृहित धरला जातो. ‘बेस्ट’च्या प्रत्येक गाडीसाठी अंदाजे सहा ते दहा कर्मचारी नेमावे लागतात. यात तीन पाळ्यांत काम करणारे तीन चालक व तीन वाहक, आगारात गाडीची देखभाल आणि दुरुस्ती  कर्मचारी यांचा समावेश असतो. त्यांचे वेतन, इंधन खर्च, देखभाल खर्च हे सगळे त्या मार्गावरील प्रवाशांकडून आणि बसवरील जाहिरातीच्या उत्पन्नातून भागले, तर ते मार्ग ‘ना नफा ना तोटा’ धोरणानुसार चालतात. खर्चापेक्षा जास्त उत्पन्न असेल, तर तो मार्ग फायद्याचा आणि उत्पन्नापेक्षा त्या मार्गावरील खर्च जास्त असेल, तर तो मार्ग तोटय़ात असतो.

‘बेस्ट’चे एकूण मार्ग – ५१५
प्रवासी – अंदाजे ४० लाख
ताफ्यातील गाडय़ा – ४२००
फायद्यातील मार्ग – २
बरोबरीतील मार्ग – १८७
तोटय़ातील मार्ग – ३२६