मुंबई : परीक्षेत नापास झाल्यामुळे इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांनी आसाम येथील आपल्या घरातून पलायन केले. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सद्वारे (एआय) व्यवसाय करून भरपूर पैसा कमवण्यासाठी दोघेही मुंबईत आले होते. कुटुंबियांना कोणतीही माहिती न देता त्यांनी मुंबईला जाणाऱ्या विमानाची तिकीटे काढली होती. याबाबत समजताच आसाम पोलिसांनी मुंबई पोलिसांना याची माहिती दिली. त्यानुसार सहार पोलिसांनी मुंबई विमानतळावर शोध घेतला असता दोन्ही मुले सापडली. त्यांना लवकरच कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आसाममधील १४ आणि १५ वर्षांची दोन मुले बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबियांनी दुमदुमा पोलीस ठाण्यात केली होती. त्यावेळी तपासणीत मुंबईला जाणाऱ्या विमानात मुले बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर आसाम पोलिसांनी तात्काळ याबाबतची माहिती मुंबई पोलिसांना दिली. सहार पोलीस, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, सीमाशुल्क दल यांच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावर शोध मोहीम राबवली. बुधवारी मध्यरात्री १ च्या सुमारास आलेल्या विमानातून दोन्ही मुले मुंबई विमानतळावर उतरली. दोन्ही मुलांना सहार पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून याबाबतची माहिती आसाम पोलिसांना देण्यात आली आहे. तसेच मुलांच्या कुटुंबियांनाही याबाबतची माहिती दिली असून तेथून ते मुंबईला येण्यासाठी निघाले आहेत. त्याच्यासोबत आसाम पोलीस अधिकारीही आहेत. ते मुंबईत आल्यावर मुलांना त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

हेही वाचा : मुंबई : महापालिकेचे अधिकारी एवढे अतार्किक कसे ? पदपथावरील बोलार्डमधील कमी अंतरावरून उच्च न्यायालयाने फटकारले

म्हणून केले पलायन…

चौकशीत दोन्ही मुले इयत्ता नववीच्या घटक चाचणी परीक्षेत नापास झाली होती. त्यामुळे आता पुढे शाळा सोडून व्यवसाय करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्याबाबत ऑनलाईन सर्च केले असता ‘एआय’च्या मदतीने व्यवसाय करून भरपूर पैसा कमवता येऊ शकतात, असे त्यांना समजले. पण याबाबत कुटुंबियांना सांगितले, तर ते परवानगी देणार नाहीत. म्हणून दोघांनीही कुटुंबियांना न सांगताच मुंबईला जाण्यासाठी विमानाची तिकीटे काढली. कुटुंबियांना कोणतीही कल्पना न देताच ते मुंबईला रवाना झाले. पण मुलांनी केलेल्या आर्थिक व्यवहारांवरून त्यांनी विमानाचे तिकीट घेतल्याचे लक्षात आले. अधिक माहिती घेतली असता त्यांनी खासगी विमान कंपनीच्या ‘१६ बी’ व ‘१६ सी’ ही तिकीटे खरेदी केल्याचे लक्षात आले. मुंबईला येणाऱ्या विमानात मुले असल्याचे समजताच आसाम पोलिसांनी मुंबई पोलिसांना याबाबत माहिती दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2 school students from assam run from home to do business with artificial intelligence mumbai print news css
Show comments