लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : महानगरपालिकेच्या उद्यान खात्यातर्फे पर्यावरण संतुलनासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या एस विभाग कार्यालयातर्फे नुकतेच पवई परिसरातील पंडित दीनदयाळ उपाध्याय उद्यानात मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी ८० भारतीय वृक्षांच्या तब्बल २ हजार रोपांची लागवड करण्यात आली. त्यात करंज, तामण, तुती ,रिठा, कळंब, निर्गुडी, बेहडा ,खैर ,कांचन, पळस आदी विविध झाडांच्या रोपांचा समावेश होता.

मुंबईत सुरू असलेल्या विविध विकासकामांचा फटका पर्यावरणाला बसत आहे. त्यामुळे हवा प्रदूषणातही मोठ्या प्रमाणात झाली आहे. विकासकामाआड येणाऱ्या अनेक झाडांवर कुऱ्हाडही चालवली जात असून हवामान बदलाचा‎ मानवी जीवनावर विपरित‎ परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. पर्यावरणाचे संतुलन टिकवण्यासाठी महानगरपालिका तोडलेल्या झाडांच्या बदल्यात अन्य ठिकाणी वृक्षलागवड करत आहे. तसेच, महापालिकेच्या उद्यान खात्यातर्फे मियावाकी वृक्ष लागवडीवर अधिक भर दिला जात आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पवई येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय उद्यानात वृक्ष लागवड‎ करण्यात आली.

उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी व उप उद्यान अधीक्षक साहेबराव गावित यांच्या मार्गदर्शनाखाली एस विभागाचे सहाय्यक उद्यान अधीक्षक ऋषिकेश हेंद्रे यांनी हा उपक्रम राबविला. उद्यानातील सुमारे ५०० चौ. मी. क्षेत्रफळात ८० भारतीय वृक्षांची तब्बल २ हजार रोपे लावण्यात आली. या उपक्रमात नेचर फोरएव्हर सोसायटी या संस्थेचाही सहभाग होता. करंज, मुचकुंद, पांगारा, उंबर, मोह, मोहोगनी, तामण, शिवण, शिसम, तुती, रिठा, कळंब, अर्जुन, निर्गुडी, कुडा, बेहडा, खैर, कांचन, पळस आदींची रोपे मियावाकी पद्धतीने लावण्यात आली.

महापालिकेच्या उद्यान खात्याने यापूर्वीही केंद्र शासनाच्या ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमाअंतर्गत मुंबईतील अनेक भागांमध्ये वृक्षारोपण केले आहे. तसेच, पालिकेच्या अन्य विभागांमध्ये वेळोवेळी मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण करण्यात येत आहे.

मियावाकी पद्धतीचे वैशिष्ट्ये

१) पारंपरिक वृक्षारोपणाच्या तुलनेत १० पट जास्त घनदाट जंगल निर्माण होते.
२) झाडे ३० पट वेगाने वाढतात आणि २-३ वर्षांत स्वयंपूर्ण जंगल तयार होते. पक्षी, कीटक आणि प्राण्यांसाठी उत्तम अधिवास तयार होतो.
३) स्थानिक आणि नैसर्गिक वनस्पतींचा वापर पर्यावरणास पूरक असतो.
४) सुरुवातीचे २-३ वर्षे देखभाल आवश्यक असते, त्यानंतर जंगल स्वतः वाढते.
५) झाडांमुळे हवेतील कार्बन डायऑक्साइड कमी होतो आणि तापमान नियंत्रित राहते.