निष्कासित केलेल्या गॅरेजच्या बदल्यात कायमस्वरूपी पर्यायी जागा देण्याकरिता नऊ वर्षांपूर्वी २५ हजार रुपयांची लाच घेणारे एमएमआरडीएचा भूमी व्यवस्थापक बापू नुकते आणि भूमापक संजीव पाटील यांना विशेष न्यायालयाने दोषी धरत दोन वर्षांच्या कासावासाची शिक्षा सुनावली. शनिवारी न्यायालयाने हा निकाल दिला.
तक्रारदाराच्या गॅरेजवर कारवाई करीत ते निष्कासित करण्यात आले होते. परंतु या गॅरेजच्या बदल्यात कायमस्वरूपी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचे सांगत नुकते आणि पाटील यांनी तक्रारदाराकडे २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यांना ते देण्याचे आश्वासन देत तक्रारदाराने दोघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती. या तक्रारीच्या पाश्र्वभूमीवर ४ ऑक्टोबर २००५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून नुकते आणि पाटील यांना तक्रारदाराकडून २५ हजार रुपयांची लाच घेताना अटक केली.
या दोघांविरुद्ध विशेष न्यायालयात खटला चालविण्यात आला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. के. केवले यांनी पोलिसांनी या दोघांविरुद्ध सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे दोघांनाही दोषी ठरवून दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच न्यायालयाने नुकते यांना ३०, तर पाटील यांना १५ हजार रुपयांचा दंडही सुनावला असून दंड न भरल्यास आणखी ४ महिन्यांची शिक्षा भोगावी लागणार आहे.

Story img Loader