लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळ आर्थिक गर्तेत अडकले असून करोनाकाळ आणि कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी आंदोलनामुळे एसटी महामंडळाचा आर्थिक डोलारा डळमळीत झाला आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होत असून एसटीला चांगले दिवस येवू लागले आहेत. तथापि, आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज बांधवांनी सुरू केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले असून त्याचा थेट फटका एसटी महामंडळाला बसला आहे. एसटी महामंडळाला आतापर्यंत सुमारे १७ ते २० कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे.
मराठा आंदोलनाचा प्रभाव मराठवाड्यात जास्त असल्याने एसटी महामंडळाला येथील आगारे बंद करण्याची वेळ आली आहे. तसेच अनेक एसटी बस रस्त्यावर अडविण्यात येत असून बसची मोडतोड, जाळपोळ करण्यात येत आहे. त्यामुळे एसटीने अनेक मार्ग बंद केले आहेत. एसटीने मराठवाड्यातील परभणी, धाराशीव, लातूर, जालना, नांदेड, बीड, छत्रपती संभाजीनगर व पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर या जिल्ह्यांतील एसटी वाहतूक बंद केली आहे. तसेच राज्यभरातून मराठवाड्याकडे जाणारी एसटी सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे दररोज लाखो प्रवाशांना आंदोलनाचा त्रास सहन करावा लागत आहे.
आणखी वाचा-कर्करोग रुग्णांना आता स्वतः ठरवता येणार उपचाराची दिशा; टाटा रुग्णालयाचा नवा उपक्रम
एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यातील ५० पेक्षा अधिक आगारे बंद आहेत. रविवारपासून बुधवारपर्यंत १०० पेक्षा जास्त एसटी बसची मोडतोड करण्यात आली आहे. तर ४ एसटी बसगाड्यांना आग लावण्यात आली आहे. यामुळे एसटी महामंडळाला सुमारे ५ कोटी रुपयांचे नुकसान झाले. या विभागातील होणारी वाहतूक पूर्णतः आणि अंशतः बंद असल्याने एसटीचे प्रतिदिन ३ ते ३.५ कोटी रुपये उत्पन्न बुडत आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांत महामंडळाला १२ ते १४ कोटी रुपये महसूल मिळालेला नाही. तर ५ कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. परिणामी, एसटीला १७ ते २० कोटी रुपयांचा फटका बसला आहे.