राज्यातील २० टक्के कुक्कुटपालन व्यवसाय बंद झाल्याने कोंबडय़ांची टंचाई; चिकनचे दर वाढण्याची भीती राज्यावर ओढवलेल्या दुष्काळ संकटामुळे भाज्या आणि डाळींच्या किमती वाढू लागल्या असतानाच मांसाहाऱ्यांनाही नजीकच्या काळात दुष्काळाचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील २० टक्के कुक्कुटपालन केंद्रे बंद पडली असून त्यामुळे कोंबडय़ांची संख्या कमी झाली आहे. पाण्याचा अभाव आणि प्रचंड उष्मा यामुळे कोंबडय़ांच्या वजनावरही विपरीत परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे मुंबईतील कोंबडय़ांची आवक घटली असून मार्चच्या तुलनेत एप्रिलमधील कोंबडीचे दर दहा टक्क्यांनी वाढले आहेत. त्यात येत्या काळात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
मुंबईला नाशिक, पुणे, अलिबाग, नगर, सांगली, औरंगाबाद आदी ठिकाणांहून कोंबडय़ांची आवक होते. यापैकी बहुतांश भाग सध्या दुष्काळाच्या छायेत आहे. पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने येथील सुमारे २० टक्के व्यावसायिकांनी कोंबडी उत्पादन केंद्रे बंद केली आहेत. कोंबडी उत्पादनात नाशिक देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथील किन्नर, येवला, नांदगाव, मालेगाव, सटाणा, देवळा, चांदवड तालुक्यांत दुष्काळाची तीव्रता प्रचंड आहे. मालेगावमधील माळमाथा गावातील तब्बल ५० टक्के कुक्कुटपालन केंद्रे बंद पडली आहेत.
दुसरीकडे, पाणीटंचाई आणि सध्या असलेला प्रचंड उष्मा यामुळे कोंबडय़ांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे. अशा स्थितीत कोंबडय़ांना पुरसे खाद्य मिळत नसल्याने त्यांचे वजन घटू लागले आहे. एरवी बाजारात येणाऱ्या कोंबडीचे वजन साधारण २ किलो ३०० ग्रॅम असते. मात्र, सध्या ते १ किलो ८०० ग्रॅम भरत आहे. आधीच घटलेली आवक आणि त्यात कोंबडय़ांच्या वजनातील घट यामुळे चिकनचे दर वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सध्या कुक्कुटपालन केंद्रांमधून घाऊक विक्रेत्यांना ८० ते ५० रुपये प्रति किलो दराने कोंबडय़ा मिळत आहेत. किरकोळ बाजारात त्याच कोंबडय़ा प्रति किलो १३० रुपयांहून अधिक दराने मिळू लागल्या आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा