मुंबई : काही दिवसांपूर्वी बेकायदेशीरपणे आरेच्या जंगलात सोडण्यात आलेल्या कांदिवलीतील भटक्या श्वानांच्या बचावासाठी हाती घेतलेली शोध मोहीम तिसऱ्या दिवशीही सुरू होती. मुंबईमधील सुमारे ३५ प्राणीप्रेमी आरेच्या जंगलात या भटक्या श्वानांचा शोध घेत आहेत. आतापर्यंत १० श्वान सापडले. तर दोन श्वान मृतावस्थेत सापडले असून त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला असावा असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी कांदिवलीमधील भटक्या श्वानांना बेकायदेशीरपणे आरेच्या जंगलात सोडण्यात आले होते. जंगलात सोडण्यात आलेल्या श्वान संकटात सापडण्याची शक्यता आहे. तसेच त्यांच्यामुळे आरेतील जैवविविधतेलाही धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे श्वानांच्या बचावासाठी प्राणीप्रेमींनी शोध मोहीम हाती घेतली आहे.
श्वानांचा आवाज, त्यांच्या पायांचे ठसे आणि त्यांची राहण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी प्राणीप्रेमी त्यांचा शोध घेत आहेत. जंगलातील अवघड मार्ग इतर वन्यप्राण्यांच्या वावर आदी अडचणींचा सामना करीत प्राणीप्रेमी श्वानांच्या बचावासाठी धडपडत आहेत. जंगलात सोडलेले अनेक श्वान अद्याप सापडलेले नाहीत. काही श्वान मृतावस्थेत सापडले आहेत. काहींना सुरक्षित ठिकाणी हलवून, त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. स्थानिक नागरिक आणि काही पर्यावरण कार्यकर्ते या मोहिमेत सहभागी झाले आहेत.
या शोध मोहिमेसाठी प्रशासनाकडून सहकार्य मिळत नसल्याची तक्रार प्राणीप्रेमींकडून करण्यात येत आहे. या शोध मोहिमेदरम्यान आतापर्यंत १० श्वानांना जीवदान मिळाले आहे. तर, दोन श्वान मृतावस्थेत सापडले असून ते गंभीर जखमी झाले होते. बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गेले तीन दिवस सकाळी ७ वाजल्यापासून प्राणीप्रेमी शोध मोहीमेला सुरुवात करीत आहेत. सायंकाळी अंधार पडू लागताच शोधमोहीम थांबविण्यात येते.
कांदिवली पूर्व येथील एका गृहसंकुलातील काही रहिवाशांनी श्वानांच्या वाढत्या त्रासाला कंटाळून कोणतीही प्रशासकीय परवानगी न घेता तब्बल २० श्वानांना पकडून थेट आरेच्या जंगलात सोडले होते. ही घटना रविवारी घडली. या घटनेची चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
रेबीजचा धोकाभटक्या श्वानांमुळे रेबीजसारखे संसर्गजन्य आजार वन्य प्राण्यांमध्ये पसरू शकतात. त्याचा वन्यजीवांवर जीवघेणा परिणाम होऊ शकतो, विशेषतः लुप्तप्राय किंवा दुर्मिळ प्रजाती धोक्यात येऊ शकते. याचबरोबर शिकार व स्थानिक अन्नसाखळी बिघडू शकते.
प्रजननावर परिणाम
भटके श्वान कोल्हा, लांडगा यासारख्या प्रजातींसोबत एकत्र आल्यास, वावरल्यास त्यामुळे त्यांच्यातून एक वेगळा संकर निर्माण होण्याची शक्यता असते. प्रजननाच्या हंगामात श्वानांचा गोंगाट आणि वावरामुळे वन्यजीव तणावात येतात, स्थलांतर करतात किंवा प्रजनन करत नाहीत. याचबरोबर श्वानांचा समूह जंगलात राहायला लागल्यास त्यांच्या वावरामुळे जंगलातील जैवविविधतेचे संतुलन ढासळू शकते.
आक्रमक वर्तन
काही वेळा श्वान हरीण, लांडगे अशा वन्य प्राण्यांवर हल्ले करतात. जंगलात गेलेले भटके श्वान मानवी वस्त्यांजवळ जाऊ शकतात आणि वन्य प्राण्यांना त्या भागात आकर्षित करतात, त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्षही वाढू शकतो.