राज्यात आतापर्यंत २० तालुके वगळता बाकी सर्वत्र आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत चांगला पाऊस झाला असून, टँकर्स आणि जनावरांच्या छावण्यांची संख्याही निम्म्यावर आली आहे. मदत व पुनर्वसनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत राज्यातील पाऊस व पीक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. राज्यातील एकूण ३५८ तालुक्यांपैकी २० तालुके वगळात सर्वत्र आतापर्यंत चांगला पाऊस झाला आहे. सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद आणि सोलापूर या जिल्ह्य़ांमधील काही तालुक्यांमध्ये कमी पाऊस झाला आहे. यामध्ये मदत व पुनर्वसन खात्याचे मंत्री डॉ. पतंगराव कदम यांचा पलूस, गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा तासगाव यासह जत या सांगली जिल्यातील तालुक्यांचा समावेश आहे. उस्मानाबाद जिल्ह्य़ातील उमरगा, परांडा, नगर जिल्ह्य़ातील नेवासा, सोलापूर जिल्ह्य़ातील मंगळवेढा, दक्षिण सोलापूर या तालुक्यांचा समावेश असल्याचे मदत व पुनर्वसन खात्याचे सचिव मिलिंद म्हैसकर यांनी सांगितले.
दुष्काळाच्या झळा बसत असताना राज्यात सुमारे साडेपाच हजार टँकर्सच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात होता. आता टँकर्सची संख्या २८००वर घटली आहे. छावण्यांमधील जनावरांची संख्याही निम्म्यांनी घटली आहे.