ठाणे, कळवा, मुंब्रा यासारख्या शहरांमधील बेकायदा परंतु धोकादायक ठरविण्यात ५७ अतिधोदायक इमारतींमध्ये वास्तव्य करणाऱ्या शेकडो कुटुंबांचे एमएमआरडीएने बांधलेल्या रेन्टल हाउसिंग प्रकल्पांतील घरांमध्ये स्थलांतर एकीकडे रखडले असताना याच शहरांमधील सुमारे एक हजारांहून अधिक धोकादायक इमारतींमधील रहिवाशांसाठी २० हजार घरे बांधण्याचा प्रकल्प ठाणे महापालिकेने आखला आहे. त्यासाठी ९६ कोटी रुपयांचा सविस्तर विकास आराखडा तयार केला आहे. महापालिका हद्दीत सुमारे नऊ भूखंडांची यासाठी निवड करण्यात आली आहे. त्यावर अडीच चटईक्षेत्र निर्देशांकाचा वापर करत सात, आठ तसेच १२ मजल्यांचे टॉवर उभे केले जाणार आहेत. यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार असून तेथे मंजुरी मिळाल्यानंतरच संक्रमण इमारती आणि पायाभूत सुविधांचा हा प्रकल्प प्रत्यक्षात येऊ शकणार आहे. धोकादायक इमारतींचा आकडा लक्षात घेता ही घरे पुरेशी ठरतील का, याविषयी प्रश्नचिन्ह असले तरी २० हजार घरे उभारुन संक्रमण इमारतींची पायाभरणी करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.
शीळ मुंब्रा येथील इमारत दुर्घटनेनंतर ठाणे महापालिकेने शहरातील बेकायदा तसेच धोकादायक इमारतींची पहाणी सुरु केली आहे. यामध्ये सुमारे ११०६ इमारती अनधिकृत तसेच धोकादायक आढळून आल्या आहेत. यापैकी ५७ इमारती या अतिधोकादायक म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. या ५७ इमारतींमधील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने यापूर्वी तयार केलेल्या रेन्टल हाउसिंग प्रकल्पांतील १६० चौरस फुटाच्या घरांमध्ये येथील रहिवाशांना हलविण्यात येणार आहे. खरे तर पावसाळ्यापुर्वीच हे स्थलांतर केले जाणार होते. मात्र, अजूनही ही प्रक्रिया सुरु झालेली नाही. या पाश्र्वभूमीवर शहरातील इतर बेकायदा धोकादायक इमारतींमध्ये रहाणाऱ्या रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी संक्रमण इमारती उभारण्याचा सविस्तर प्रस्ताव ठाणे महापालिकेने तयार केला असून त्यासाठी ५० टक्के निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून उभारण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे.
असा असेल प्रकल्प..
या संक्रमण इमारतींसाठी ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा परिसरात नऊ भूखंडांची निवड झाली आहे. यापैकी दोन भूखंड महापालिकेकडे असून काही जिल्हाधिकारी तर काही वन विभागाच्या अखत्यारित येतात. ते महापालिकेकडे विनामूल्य हस्तांतरीत व्हावेत, असा पालिकेचा प्रयत्न आहे. या नऊ ठिकाणी अडीच चटईक्षेत्र निर्देशांकाचा वापर करुन नऊ ते बारामजली इमारती उभ्या केल्या जाणार असून त्यामध्ये १६० चौरस फुटाची सुमारे २० हजार ३२० घरे बांधण्यात येणार आहेत. या वसाहतींलगत पायाभूत सुविधा उभारण्याची योजना असून त्यासाठी लागणारी ५० टक्के रक्कम ही केंद्र सरकारच्या राजीव आवास योजना तसेच उर्वरीत ५० टक्के रककम ही ठाणे महापालिकेस विकास हक्क हस्तांतरणाच्या माध्यमातून उपलब्ध करुन घेण्याची योजना आहे. संक्रमण इमारती उभारल्यानंतर ११०० बेकायदा इमारती पाडण्यात येणार आहे. तसेच ५७ अतिधोकादायक तसेच इतर इमारतींचे तांत्रिक परिक्षण, सर्वेक्षण आणि या इमारतींचा टिकावूपणा शोधण्याची कामेही या काळात केली जाणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा