लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई: माटुंगा येथील बहुमजील इमारतीच्या छतावरून पडून २० वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनी झायना सेठिया (२०) हिचा मृत्यू झाला. तिने नैराश्यातून इमारतीच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय आहे. ती आपल्या कुटुंबासह ‘टेक्नो हाइट्स’ या १४ मजली इमारतीमधील आठव्या मजल्यावर राहत होती. गेल्या काही दिवसांपासून ती नैराश्यात होती. याप्रकरणा माटुंगा पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
नैराश्येत होती
गेल्या काही दिवसांपासून झायना नैराश्यात होती. झायनाच्या दोन मित्र-मैत्रिणी मंगळवारी रात्री तिच्या घरी आले होते. तिने त्यांना इमारतीच्या छतावर नेले. तेथे त्यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, अचानक आणि अनपेक्षितपणे झानाने छतावरून उडी मारली. त्यामुळे तिचे मित्र-मैत्रिण प्रचंड तणावाखाली आहेत.
जागीच मृत्यू
इमारतीच्या छतावरून उडी मारल्यानंतर झायना शेजारील इमारतीच्या खिडकीवर आपटली आणि अंदाजे १५ फूट अंतरावरील संरक्षक भिंतीवर कोसळली. तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ती गंभीर जखमी झाली होती. तिला शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मृत मुलगी दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध महाविद्यालायात शिक्षण घेत होती. गेल्या काही दिवसांपासून ती नैराश्यात होती.
पोलीस तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच माटुंगा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्या आला. या प्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुलगी गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होती. त्यामुळे तिने आत्महत्या केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांनी सांगितले. याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी तिच्या दोन्ही मित्र-मैत्रिणीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे, मात्र त्यांनाही मोठ्या मानसिक धक्का बसला असून ते व्यवस्थित माहिती देत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
पोलीस सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या मदतीने तपास करत आहेत. तिच्या घरी मंगळवारी रात्री आलेले मित्र-मैत्रिण या घटनेचे प्रत्यक्षदर्शी असून प्राथमिक माहितीनुसार तिने आत्महत्या केल्याचे पोलिसांना समजले. याप्रकरणी साक्षीदारांचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे तिचे दोघेही मित्र-मैत्रीण तणवाखाली आहेत. तसेच कुटुंबियांनाही मोठा धक्का बसला आहे. तसेच सुरक्षा रक्षकांकडूनही घटनेची माहिती घेण्यात येत आहे.