इगतपुरीत मुंबईकडे येणाऱ्या ट्रेनमध्ये शुक्रवारी (८ ऑक्टोबर) एका २० वर्षीय महिलेवर ८ दरोडेखोरांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेस इगतपुरी-कासारा दरम्यान असताना हा प्रकार घडला. दरोडेखोरांनी ट्रेन घाट परिसरातून जात असताना पीडितेवर अत्याचार केले, अशी माहिती पोलिसांनी दिलीय. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत ४ आरोपींना अटक केली आहे.

रेल्वेतून मोबाईल फोनचीही चोरी

विशेष म्हणजे या दरोडेखोरांनी रेल्वेत चोऱ्याही केल्या. आरोपींनी जवळपास ९६ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल चोरला आहे. यात मोबाईलचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. आतापर्यंत पोलिसांनी ३४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात सामूहिक बलात्कार करणे, दरोडा टाकणे, चोरी करणे अशा विविध कलमांखाली कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.

रेल्वे पोलिसांकडून ४ आरोपींना अटक

मुंबई रेल्वे पोलीस आयुक्त कुसेर खालीद म्हणाले, “रेल्वे घाट परिसरातून जात असताना आरोपींनी महिलेवर अत्याचार केला. आरोपी इगतपुरी रेल्वे स्टेशनवर डी २ या स्लीपर डब्यात चढले आणि घाट परिसरात त्यांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला. ट्रेन कसाऱ्यात पोहचल्यावर प्रवाशांनी मदत मागितली. यानंतर रेल्वे पोलिसांनी तातडीने कारवाई करत ४ जणांना अटक केली.”

आरोपींची कसून चौकशी सुरू

“पीडिता २० वर्षांची असून तिला महिला पोलीस अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी नेलं आहे. पीडितेची प्रकृती स्थिर आहे. आम्ही सर्व पुरावे गोळा करत आहोत. आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. आम्ही आरोपींचे आधीचे रेकॉर्ड्स देखील तपासत आहोत,” अशीही माहिती खालीद यांनी दिली.

Story img Loader