नौदलातील आपल्या मुलाच्या झालेल्या अपघाती मृत्यूची खरी माहिती द्या, म्हणून गेल्या २१ वर्षांपासून नौदल प्रशासनाविरुद्ध लढा देणाऱ्या डोंबिवलीतील अनुराधा पळधे यांना अखेर यश मिळाले आहे. हैदराबाद न्यायालयाने त्यांचा मुलगा अमर याचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे नमूद करीत नौदलाला निष्काळजीपणाच्या आरोपाखाली दोषी ठरविल्याने पळधे यांच्या लढय़ाला नवे बळ मिळाले आहे. न्यायालयाने नोंदविलेल्या निरीक्षणाचाच आधार घेत अनुराधा यांनी नौदल आणि संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी तक्रार नोंदविण्याची तयारी सुरू केली आहे.
सोमवारी पत्रकार परिषदेत अनुराधा पळधे यांनी याबाबतची माहिती दिली. त्या वेळी त्यांचे वकील सुरेश गानू हेही उपस्थित होते. कुणी मुलाला सैन्यात पाठवू नये, असे माझे आजही म्हणणे नाही. मुलाला वीरमरण आले, तर त्याचा सार्थ अभिमान प्रत्येक आईला असतो. परंतु असा मृत्यू कुठलीही आई सहन करू शकत नाही. त्यातही नौदलाकडून असे कृत्य होणे दुर्दैवी आहे. या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आपण शेवटपर्यंत लढा देणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
अशा प्रकारे किती अमर गूढ मृत्यूचे बळी ठरले आहेत. परंतु त्यावर नौदलाकडून नेहमीच पांघरूण घातले गेले. त्यामुळे भरपाई मिळविणे हा लढय़ामागचा हेतू नाही, तर दोषींना शिक्षा करण्यासाठी आणि अशा प्रकारांना खीळ बसविण्याच्या उद्देशाने तसेच त्याद्वारे आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण शेवटच्या श्वासापर्यंत लढणार असल्याचेही पळधे यांनी सांगितले.
जीवनात काहीतरी वेगळे आणि आव्हानात्मक करायचे म्हणून अमर जानेवारी १९९० मध्ये नौदलात शिपाई म्हणून दाखल झाला होता. सप्टेंबर १९९३ मध्ये अमरची आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथील विशेष प्रशिक्षणासाठी निवड झाली. हेलिकॉप्टरमधून पाण्यात उडी मारण्याचा सराव सुरू असताना अमरला २१ सप्टेंबर १९९३ रोजी अपघात होऊन तो बेपत्ता झाला. एका कोळ्याला त्याचा मृतदेह सापडला. घटनेनंतर दोन दिवसांनी अमरच्या डोंबिवलीतील घरी निरोप आला. घटनास्थळी अमरच्या अंगावर नातेवाईकांना जखमा आढळल्या. अधिकाऱ्यांकडून काही संशयास्पद हालचाली झाल्या. तो हृदयविकाराच्या धक्क्याने दगावल्याचे सांगण्यात आले. चौकशी अहवालात काही अंशी निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा उल्लेख असल्यामुळे अशोक व अनुराधा पळधे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. युद्धात मरण आले तर त्याला ‘वीर’ मानतात आणि त्याच्या मातेला ‘वीरमाता’. पण देशभक्तीच्या भावनेतून सैन्यात पाठवलेला मुलगा गमावूनही खचून न जाता न्यायासाठी लष्करी यंत्रणेविरोधात उभी ठाकून २१ वर्षे लढणाऱ्या अनुराधा या एका अर्थी ‘वीरमाता’च ठरल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा