मुंबई : भांडुप संकुल येथे लवकरच २ हजार दशलक्ष लीटर क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार असून त्यासंदर्भातील विविध कामे पालिकेने हाती घेतली आहेत. जुन्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे बांधकाम कमकुवत झाल्यामुळे नवीन प्रकल्प उभारण्याचा पालिकेने निर्णय घेतला आहे. नवीन जलशुद्धीकरण प्रकल्पाचे बांधकाम जुलै २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचा संकल्प पालिकेने सोडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईला ऊर्ध्व वैतरणा, तानसा, मध्य वैतरणा, मोडक सागर आणि भातसा या धरणांमधून मुंबईला दररोज ३९०० दशलक्ष लीटर इतका पाणीपुरवठा केला जातो. तुळशी आणि विहार वगळता अन्य धरणे मुंबईपासून सुमारे १०० किलोमीटरहून अधिक अंतरावर आहेत. या धरणांतून सुमारे ३ हजार मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी आणि साडेपाच हजार मिलीमीटर व्यासाच्या भूमिगत बोगद्यांमधून पाणी पिसे पंजरापुर आणि भांडुप जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. भांडुप संकुलात सुमारे ४४ वर्षांपूर्वी प्रतिदिन १९१० दशलक्ष लीटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे बांधकाम करण्यात आले. या प्रकल्पातून माध्यमातून मुंबईकरांना स्वच्छ आणि शुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यापैकी सुमारे ६५ टक्के पाणीपुरवठा भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रातून होतो. सद्यस्थितीत हा प्रकल्प संरचनात्मकदृष्ट्या कमकुवत झाल्यामुळे पूर्ण क्षमतेने चालविण्यात पालिकेला अडथळे येत आहेत. या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे आयुर्मान संपत आल्यामुळे पालिकेने नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प हाती घेतला आहे. तांत्रिक सल्लागार समितीच्या सल्ल्यानुसार नवीन प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

नवीन प्रकल्प कार्यान्वित होईपर्यंत जुन्या प्रतीदिन १९१० दशलक्ष लीटर क्षमतेच्या प्रकल्पातून मुंबईकरांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. या कामासाठी कंत्राटदाराचीही नियुक्ती करण्यात आली असून वैधानिक मान्यता प्राप्त करण्याचे काम सुरू आहे. संबंधित प्रकल्प २०२८ पर्यंत कार्यान्वित करण्याचा महापालिकेचा मानस आहे. महानगरपालिकेने या प्रकल्पासाठी २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात ४५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.