मुंबईतील पाच वर्षांतील आकडेवारी; विद्युत प्रणालीच्या लेखापरीक्षणासाठी पालिकेचे सरकारला पत्र
प्रसाद रावकर
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांत गेल्या पाच वर्षांत झालेल्या आगीच्या दुर्घटनांपैकी जवळपास ७५ टक्के दुर्घटना सदोष विद्युत प्रणालीमुळे घडल्याचे महापालिकेच्या पाहणीतून स्पष्ट झाले आहे. सदोष वीज प्रणालीमुळे २० हजारांहून अधिक आगीच्या दुर्घटना घडल्याचे पाच वर्षांतील आकडेवारी सांगते. त्यामुळे आता बहुमजली इमारतींमधील अग्निप्रतिबंधक यंत्रणेच्या तपासणीच्या धर्तीवरच विद्युत प्रणालीचे नित्यनियमाने लेखापरीक्षण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी पालिकेने राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्यातील मुख्य विद्युत निरीक्षकांना पत्रही पाठविले आहे.
गेल्या पाच वर्षांमध्ये मुंबईत एकूण २६ हजार ८५५ आगीच्या दुर्घटना घडल्या. त्यापैकी २० हजार ००९ ठिकाणी सदोष विद्युत यंत्रणेमुळे आग लागल्याचे निष्पन्न झाले आहे. सदोष विद्युत यंत्रणेमुळे आग लागण्याचे प्रमाण सर्वाधिक असून ही बाब पालिकेसाठी चिंतेची बनली आहे. महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ किंवा मुंबई महापालिका अधिनियम १८८८ मधील तरतुदीनुसार विद्युत प्रणालींचे नियतकालिक लेखापरीक्षण करण्याची तरतूद नसल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नाही.
विद्युत प्रणालीचे लेखापरीक्षण नाही
केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या अधिसूचनेतील विनियम ३० व ३६ नुसार बहुमजली इमारतींमधील विद्युत संचांचे विद्युत निरीक्षकांमार्फत लेखा परीक्षण करण्याची तरतूद आहे. मात्र राज्य सरकारने अधिसूचनेद्वारे विनियम ३० आणि ४३ च्या प्रयोजनासाठी ११ किलोव्होल्ट इतके व्होल्टेज अधिसूचित केले आहे. परिणामी, या तांत्रिक बाबीमुळे निवासी व अनिवासी इमारतींमधील विद्युत प्रणालीचे लेखापरीक्षण करण्यात येत नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे सदोष विद्युत यंत्रणेमुळे लागणाऱ्या आगींवर नियंत्रण मिळविण्यात अपयश आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा