वीजवापराचे अचूक मोजमाप, अचूक बिल आकारणीसाठी मोठा गाजावाजा करत ‘महावितरण’ने कोटय़वधी रुपये खर्च करून ‘इन्फ्रारेड’ आणि ‘रेडिओ फ्रीक्वेन्सी’ असे अत्याधुनिक वीज मीटर बसवले खरे; पण मीटर बंद पाडण्यात तरबेज असलेल्या ग्राहकांनी नामी शक्कल लढवत प्रखर लहरींचा (हाय फ्रीक्वेन्सी वेव्ह) वापर करत हे अत्याधुनिक मीटरही ‘हॅक’ केले. मात्र, महावितरणनेसुद्धा प्रतिशक्कल लढवत अधिक अत्याधुनिक मीटर आणली असून, ही मीटर हॅक करण्याचा प्रयत्न झाल्यास ती दुप्पट वेगाने फिरून दुप्पट बिल येईल.
‘महावितरण’ला सुमारे एक लाख संशयास्पद मीटर आढळली असून, त्यापैकी तब्बल २० हजार मीटर हॅक झाल्याचे पहिल्या टप्प्यात स्पष्ट झाले आहे. त्यातील बहुतांश प्रकरणे ही परभणी, जालना, औरंगाबाद, अकोला, बीड, अमरावती भागांतील आहेत. वीज मीटरमध्ये फेरफार करून ते बंद करायचे वा त्यांचा वेग मंद करायचा असे उपद्व्याप चलाख वीजग्राहक करतात. त्यामुळे वीजचोरी होऊन ‘महावितरण’चा महसूलही बुडतो. त्यावर उपाय म्हणून गेल्या दोन वर्षांत ‘इन्फ्रारेड’ आणि ‘रेडिओ फ्रीक्वेन्सी’ अशा दोन प्रकारचे अत्याधुनिक वीज मीटर राज्यभरात बसवण्याची मोहीम सुरू करण्यात आली. केवळ एका उपकरणाद्वारे आसपासच्या भागांतील मीटरचे वाचन त्यामुळे सोपे झाले. त्यातील वीजवापराचे आकडे नोंदवले गेले जाऊ लागले, पण चलाख ग्राहकांनी या अत्याधुनिक तंत्रज्ञानावरही कडी केली.
अत्याधुनिक वीज मीटरमध्ये एक ‘चीप’ असते. मीटरसमोर ‘प्रखर लहरी’ (हाय फ्रीक्वेन्सी व्हेव) सोडल्यानंतर या मीटरमधील इलेक्ट्रॉनिक यंत्रणा बंद पडते. हे उपकरण वेगाने पसरले. लोकांनी याचा वापर करून मीटर ‘हॅक’ केले. वीज मीटर हवे तेव्हा बंद आणि हवे तेव्हा सुरू राहू लागले. राज्यातील वीजवापराची छाननी करत असताना ‘महावितरण’ला सुमारे एक लाख मीटरवरील वीजवापराचे प्रमाण संशयास्पद असल्याचे आढळले. विशेष म्हणजे वीजचोरीचे प्रमाण अधिक असलेल्या परभणी, जालना, औरंगाबाद, अकोला, बीड, अमरावती या भागांतच हे प्रमाण जास्त होते. त्यामुळे ‘महावितरण’ने छाननी सुरू केली असता पहिल्या टप्प्यात २० हजार मीटर हॅक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या वीजचोरांविरोधात आता गुन्हे नोंदवले जाणार असून, २० हजार तक्रारी स्थानिक पोलीस ठाण्यात दाखल करण्यात येणार आहेत.
चलाखीस प्रतिबंध
वीजचोरांच्या या चलाखीवर आता ‘महावितरण’नेही उतारा काढला आहे. हॅकिंग प्रतिबंधक असे सॉफ्टवेअर असलेली चीप मीटरमध्ये बसवली जाणार आहे. हे सॉफ्टवेअर बसवल्यानंतर एखाद्याने प्रखर लहरींचा वापर करून मीटर बंद पाडायचा प्रयत्न केला, तर उलटेच होईल. मीटर दुप्पट वेगाने फिरू लागेल. आठवडय़ाला पाच हजार रुपये आणि महिन्याला २० हजार रुपये बिल होईल इतक्या वेगाने ते फिरू लागेल, असे ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.