सलमानची न्यायालयाकडे मागणी
मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून एकाच्या मृत्यूस व चौघांच्या गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेला अभिनेता सलमान खान याने सोमवारी या घटनेचा साक्षीदार असलेला मित्र व गायक कमाल खान याला साक्षीदार बनविण्याची मागणी उच्च न्यायालयाकडे केली. सलमानने केलेली ही मागणी न्यायालयाने मान्य केल्यास या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.
सत्र न्यायालयाने सुनावलेल्या निकालाला सलमानने उच्च न्यायालयात आव्हान दिले असून न्यायमूर्ती ए. आर. जोशी यांच्यासमोर सध्या त्याच्या अपिलावरील सुनावणी सुरू आहे. सोमवारी सलमानचे वकील अमित देसाई यांनी अर्जाद्वारे सलमानचा मित्र व घटनेच्या वेळेस त्याच्यासोबत गाडीत उपस्थित असलेला गायक कमाल खान याला साक्षीदार करण्याची मागणी केली. त्यावर न्यायालयाने सरकारी वकील संदीप शिंदे यांनी मंगळवारी उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे.
कमाल हा घटनेच्या वेळेस सलमानसोबत होता. त्यामुळे तो घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. मात्र तो साक्ष देण्यासाठी उपलब्ध असतानाही खटल्यादरम्यान त्याला साक्षीदार म्हणून का तपासण्यात आले नाही, असा प्रश्न सलमानने अर्जात केला आहे. कमालची साक्ष नोंदविण्यात आली तर ‘ती’ गाडी नेमकी कोण चालवत होते यावर प्रकाश पडण्याची शक्यता आहे. प्रकरणातील एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मानण्यात आलेला सलमानचा माजी अंगरक्षक रवींद्र पाटील याचा खटल्यादरम्यानच मृत्यू झालेला आहे. त्याने महानगरदंडाधिकाऱ्यासमोर दिलेल्या साक्षीवरच पोलिसांनी खटला चालवला. परंतु पाटील आधी बेपत्ता झाल्याने व नंतर याचा मृत्यू झाल्याने त्याची उलटतपासणी करण्याची संधी सलमानला मिळालेली नाही. शिवाय पोलिसांनी सलमानचा चालक अशोक सिंह हा अपघातानंतर तक्रार नोंदविण्यासाठी पोलीस ठाण्यात जाऊनही पोलिसांनी त्याला साक्षीदार बनवलेले नाही, असेही सलमानने अर्जात म्हटले आहे.

Story img Loader