सुमारे १० वर्षांपूर्वी मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवताना पदपथावर झोपलेल्या पाच जणांना चिरडल्याचा आरोप असलेला अभिनेता सलमान खान याच्यावर सदोष मनुष्यवधाच्या (परंतु हेतुत: नाही) कलमांअंतर्गत खटला चालवण्याचे आदेश वांद्रे महानगर दंडाधिकाऱ्यांनी गुरुवारी दिले. सलमानवर आतापर्यंत निष्काळजीपणे व बेदरकारपणे गाडी चालवल्याच्या गुन्ह्याबाबत खटला सुरू होता, मात्र नव्या कलमांमुळे दोषी ठरल्यास त्याला १० वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. न्यायालयाने त्याला ११ फेब्रुवारी रोजी सत्र न्यायालयात हजर राहण्याचे आदेशही दिले आहेत.
मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून वांद्रे येथील अमेरिकन बेकरीसमोरील पदपथावर झोपलेल्या पाच जणांना चिरडल्याचा आरोप सलमानवर आहे. या घटनेला १० वर्षे उलटली असून सलमानला पाठीशी घालण्यासाठीच पोलीस खटल्याची सुनावणी लटकवत असल्याची तक्रार संतोष दौंडकर या सामाजिक कार्यकर्त्यांने वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी हेतुत: खोटे वैद्यकीय पुरावेही सादर केल्याचा आरोप दौंडकर यांनी केला आहे. सलमानलाही न्यायालयात हजर राहण्यासाठी १०० वेळा समन्स बजावण्यात आले, मात्र आतापर्यंत तो ९० वेळा गैरहजर राहिल्याचेही दौंडकर यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
दौंडकर यांच्या तक्रारीनंतर हे प्रकरण पुन्हा उजेडात आल्यामुळे पोलिसांनीही निष्काळजीपणे गाडी चालविण्याच्या आरोपाऐवजी सलमानवर सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली खटला चालविण्याची विनंती न्यायालयाकडे एका अर्जाद्वारे केली होती.

Story img Loader