२००६मध्ये झालेल्या मालेगाव स्फोटातील मुस्लीम आरोपींना दोषमुक्त करण्याबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) घेतलेल्या भूमिकेचाच विचार करण्याची विनंती केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) शनिवारी विशेष न्यायालयाकडे केली.
या स्फोटप्रकरणी ‘एनआयए’ने हिंदू गटाच्या सदस्यांना अटक केल्यानंतर आधीच अटक करण्यात आलेल्या नऊ मुस्लीम आरोपींनी दोषमुक्त करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. त्यावर न्यायालयाने ‘एनआयए’आधी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या ‘सीबीआय’ आणि राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाला आरोपींच्या अर्जावर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ‘सीबीआय’ने आपले उत्तर दाखल करताना अर्जाबाबत ‘एनआयए’लाच भूमिका स्पष्ट करण्याचे आणि त्यांच्याच भूमिकेचा विचार करण्याचे न्यायालयाला सांगितले.
‘एनआयए’ने या मुस्लीम आरोपींविरुद्ध कुठलाच पुरावा नसल्याचे स्पष्ट करीत त्यांच्या अर्जाला विरोध करणार नसल्याचे आधीच न्यायालयात स्पष्ट केले आहे. आपण केलेल्या तपासाशी संबंधित पुरावे न्यायालयात आधीच सादर करण्यात आले असून याबाबत नव्याने सादर करण्यासारखे वा भूमिका मांडण्यासारखे आपल्याकडे काहीच नाही, असेही ‘सीबीआय’ने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. दरम्यान, ‘एटीएस’ने आरोपींच्या दोषमुक्त करण्याच्या अर्जावर उत्तर दाखल करण्यासाठी आणखी चार आठवडय़ांची मुदत देण्याची विनंती न्यायालयाकडे केली असून न्यायालयाने ती मान्य केली.

Story img Loader