मुंबई : मालेगाव येथे सप्टेंबर २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील मृतांचे शवविच्छेदन करणाऱया आणि जखमींवर उपचार करणाऱया डॉक्टरांनी दिलेल्या साक्षींशी संबंधित प्रश्न विशेष न्यायालयाकडून विचारले जात असताना याप्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर भावूक झाल्या. परिणामी, काही कालावधीसाठी प्रश्नोत्तरे थांबविण्यात आली.
या प्रकरणाचा तपास करणाऱया राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सरकारी पक्षाचे साक्षीपुरावे नोंदवण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर, सरकारी पक्षाने नोंदवलेल्या साक्षीपुराव्यांशी संबंधित प्रश्न आरोपींना विचारले जातात आणि त्यावर त्यांचे म्हणणे ऐकून व नोंदवून घेतले जाते. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. के. लाहोटी ही प्रक्रिया मंगळवारी सुरू केली. त्यानुसार, सरकारी पक्षाने आतापर्यंत नोंदवलेल्या साक्षीपुराव्यांबाबत या प्रकरणी प्रमुख आरोपी असलेल्या साध्वी यांचे म्हणणे न्यायालयाने नोंदवून घेतले.
हेही वाचा >>>अंधेरीमध्ये तिकीट तपासनीसांची फौज; एकाच दिवसात २,६९३ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करून सात लाख रुपये दंड वसूल
न्यायालयाच्या प्रत्येक प्रश्नाला मला माहीत नाही हे उत्तर देणाऱया साध्वी यांना बॉम्बस्फोटातील मृतांचे शवविच्छेदन करणाऱया आणि जखमींवर उपचार करणाऱया डॉक्टरांनी दिलेल्या साक्षींशी संबंधित प्रश्न विचारण्यास न्यायालयाने सुरूवात केली. त्याला उत्तर देताना एका क्षणाला साध्वी यांना भावना अनावर झाल्या. परिणामी, न्यायालयीन कामकाज १० मिनिटे थांबवावे लागले. याबाबतचे जवळपास ६५ ते ६० प्रश्न साध्वी यांना विचारण्यात आले. दरम्यान, साक्षीपुराव्यांशी संबंधित विचारण्यात आलेल्या सर्वच प्रश्नांना साध्वी यांनी मला माहीत नाही हे उत्तर दिले. मात्र, स्फोटातील जखमींशी संबिधत प्रश्न विचारण्यास सुरूवात झाल्यावर त्यांनी अस्वस्थ वाटत असल्याचे न्यायालयाला सांगितले.