मुंबई : मालेगाव येथे २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्याचे कामकाज पाहणारे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. के. लाहोटी यांच्या बदलीच्या निर्णयाची अंमलबजावणी उच्च न्यायालय प्रशासनाने ३१ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे. अतिरिक्त न्यायाधीश लाहोटी यांची नाशिक येथे जिल्हा न्यायाधीश म्हणून बदली करण्यात आली होती आणि उन्हाळी सुट्टीनंतर ९ जून रोजी निर्णयाची अंमलबजावणी होणार होती.
महिन्याच्या सुरुवातीला उच्च न्यायालय महानिबंधक कार्यालयाने अतिरिक्त सत्र न्यायाधीशांच्या नियमित बदल्यांबाबतची अधिसूचना काढली होती. त्यानुसार, अतिरिक्त न्यायाधीश लाहोटी यांची नाशिक येथे बदली करण्यात आली होती. तथापि, मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचे कामकाज अंतिम टप्प्यात असून अतिरिक्त न्यायाधीश लाहोटी हे येत्या काही दिवसांत खटल्याचा निकाल राखून ठेवण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, बॉम्बस्फोटातील मृतांच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना पत्रव्यवहार करून अतिरिक्त न्यायाधीश लाहोटी यांच्या बदलीचा निर्णय पुढे ढकलण्याची मागणी केली होती. दुसरीकडे, उच्च न्यायालयाच्या महानिबंधकांनी नवीन अधिसूचना काढून लाहोटी यांच्या बदलीचा निर्णय ३१ ऑगस्टपर्यंत स्थगित केला.
दरम्यान, अतिरिक्त न्यायाधीश लाहोटी यांची बदली झाल्याने न्यायदानाला विलंब होण्याची भीती बॉम्बस्फोटात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांनी मुख्य न्यायमूर्तींना पाठवलेल्या पत्रात व्यक्त केली होती. गेल्या १७ वर्षांपासून खटला सुरू असून अतिरिक्त न्यायाधीश लाहोटी हे आतापर्यंत बदली झालेले पाचवे न्यायाधीश आहेत. खटल्याचे कामकाज अंतिम टप्प्यात असून अतिरिक्त सत्र न्यायाधीश लाहोटी यांनी खटल्याचे जवळपास संपूर्ण कामकाज पाहिले आणि युक्तिवाद ऐकला आहे. खटल्यात आतापर्यंत नोंदवण्यात आलेल्या साक्षीपुराव्यांवर सरकारी आणि बचाव पक्षाचा सध्या अंतिम युक्तिवाद सुरू आहे. अशा स्थितीत अतिरिक्त न्यायाधीश लाहोटी यांची बदली झाल्यास नव्याने येणाऱ्या न्यायाधीशांना प्रकरण पूर्णपणे अवगत करावे लागेल. परिणामी, खटल्याला अपरिहार्य विलंब होऊ शकतो, अशी भीतीही पीडितांनी पत्रात व्यक्त केली होती. तसेच, खटल्याच्या अशा टप्प्यावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश लाहोटी यांच्या नियोजित बदलीला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केली होती.