पाकिस्तानातून २६/११ सारखा मोठा दहशतवादी हल्ला पुन्हा झाल्यास युद्ध सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा माजी राजनैतिक अधिकाऱ्यांनी दिला आहे. मुंबईतील हल्ल्यास दहा वर्षे २६ नोव्हेंबरला (आज) पूर्ण होत आहेत. पाकिस्तानातील लष्कर ए तोयबा या संघटनेच्या १० दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १६६ जण ठार झाले होते, त्या वेळी इतर ९ दहशतवादी मारले गेले तर अजमल कसाब हा जिवंत सापडला होता. नंतर त्याला भारतीय न्यायालयाच्या आदेशानुसार फाशी देण्यात आले होते. सीआयएचे माजी अधिकारी ब्रुस रिडेल यांनी सांगितले, की २६/११ हल्ल्यातील सूत्रधारांना अजून शिक्षा झालेली नाही व पाकिस्तानात तसे घडणेही अशक्यच आहे. रिडेल हे ब्रुकिंग इंटेलिजन्स प्रोजेक्टचे संचालक असून त्यांनी सांगितले, की असा हल्ला पुन्हा झाला तर दोन्ही देशांत युद्ध होईल.

पाकिस्तानचे अमेरिकेतील माजी राजदूत हुसेन हक्कानी यांनी सांगितले, की अमेरिका व पाकिस्तान यांच्यातील संबंध आता खालावले असून उपखंडात तणावाची स्थिती आहे. त्यामुळे भारतात पुन्हा असा हल्ला केला गेला, तर काय घडेल हे सांगणे कठीण आहे. पाकिस्तानने २६/११ हल्ल्यातील सूत्रधार दहशतवाद्यांना शिक्षा केली पाहिजे. पण त्यांनी ते वचन अजून पाळलेले नाही. २००८ च्या मुंबई हल्ल्यानतंर दोषींवर कारवाईचे आश्वासन देण्यात आले होते, त्या वेळी भारत व पाकिस्तान यांच्यात संघर्षची स्थिती होती पण त्या आश्वासनामुळे ती सावरली. अमेरिकेनेही पाकिस्तान व भारत यांना गुप्तचर माहिती देऊन शांत केले.