मुंबई : जे.जे. येथील सिग्नलजवळ २०१० मध्ये झालेल्या गोळीबारप्रकरणी कुख्यात गुंड छोटा राजन टोळीतील दोघांना विशेष सीबीआय न्यायालयाने सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने मंगळवारी कायम ठेवली. विशेष म्हणजे राजनसह तीन आरोपींची विशेष सीबीआय न्यायालयाने या प्रकरणातून निर्दोष सुटका केली होती. या निर्णयाला मात्र सीबीआयने उच्च न्यायालयात आव्हान दिले नव्हते.विशेष सीबीआयचा निकाल हा तर्कसंगत आणि कायदेशीरदृष्ट्या योग्य असल्याचे नमूद करून न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने मोहम्मद अली शेख आणि प्रणय राणे या दोन आरोपींनी शिक्षेविरोधात केलेले अपील फेटाळले. प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीवर अवलंबून असलेल्या या प्रकरणात अपीलकर्त्यांना दोषी ठरवण्याचा निर्णय योग्य होता हे सिद्ध करण्यात सरकारी पक्ष यशस्वी झाला आहे, असेही न्यायालयाने नमूद केले. पंधरा वर्षे जुना खटला प्रामुख्याने चार प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीवर अवलंबून होता. परंतु, प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीतील त्रुटींवर अपीलकर्त्यांच्या वकिलांनी युक्तिवादाच्या वेळी बोट ठेवले होते. तथापि, एका प्रत्यक्षदर्शीच्या साक्षीच्या आधारे देखील आरोपींना दोषी ठरवले जाऊ शकते हे कायद्याने मान्य केल्याची बाब न्यायालयाने स्पष्ट केली. तसेच, साक्षीदार विश्वासार्हतेच्या कसोटीवर टिकू शकला नाही किंवा तो पूर्णपणे अविश्वसनीय साक्षीदार असल्याचे न्यायालयाला आढळून आले, तरच त्याची साक्ष नाकारली जाते, असेही न्यायालयाने म्हटले.

या प्रकरणातील प्रमुख प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा कथित साथादीर आसिफ खान याने संपूर्ण घटनेचे सचित्र वर्णन विशद केले होते आणि गोळीबारात तो जखमी झाला असल्याने गुन्ह्याच्या ठिकाणी त्याची उपस्थिती संशयास्पद असू शकत नाही. याउलट, त्याची साक्ष महत्त्वाची मानली पाहिजे, असे न्यायालयाने शेख आणि राणे यांचे अपील फेटाळताना नमूद केले. त्याचप्रमाणे, जखमी झाल्यानंतर खान हा घटनास्थळावरून पळून गेला किंवा ओळख परेड उशिरा झाल्याच्या कारणास्तव त्याच्या साक्षीकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

प्रकरण काय ?

फेब्रुवारी २०१० मध्ये आसिफ खान याच्यावर दक्षिण मुंबईतील नागपाडा भागात पदपथावर अज्ञातांनी गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यात जखमी झालेला शेख घटनास्थळावरून पळून गेला. मात्र, त्याला भेटण्यासाठी आलेले शकील मोडक आणि आसिफ कुरेशी हे दोघे या गोळीबात ठार झाले. पोलिसांनी राणे याला अटक केली, त्याने चौकशीत राजनसह अन्य आरोपींची नावे आणि भूमिका उघड केल्याचा पोलिसांचा आरोप होता.