मुंबई : मालवणी येथे २०१५ मध्ये घडलेल्या दारूकांडाप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या चार आरोपींना सत्र न्यायालयाने बुधवारी दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. या दारूकांडात निकृष्ट दर्जाची दारू प्यायल्याने १०६ जणांचा मृत्यू झाला होता, तर ७५ जणांपैकी काहींना अंधत्त्व आले होते, तर काहींना गंभीर आजाराने ग्रासले होते.
राजू तापकर, डोनाल्ड पटेल, फ्रान्सिस डिमेलो आणि मन्सूर खान या चारही दोषसिद्ध आरोपींना शिक्षेत दया दाखवावी अशी कोणतीही स्थिती आपल्या निदर्शनास आणून देण्यात आलेली नाही. त्यामुळे, आरोपींना दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात येत आहे, असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश स्वप्निल तावशीकर यांनी आरोपींच्या शिक्षेचा निर्णय देताना प्रामुख्याने नमूद केले. आरोपींनी गंभीर गुन्हा केला आहे. त्यामुळे, आरोपींना अधिकाधिक शिक्षा सुनावण्यात यायला हवी. आरोपींना कठोर शिक्षा सुनावल्यास अशा प्रकारचे गुन्हे करण्यास कोणी धजावणार नाही, असा युक्तिवाद राज्य सरकारच्यावतीने विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केला होता व आरोपींना कठोर शिक्षा सुनावण्याची मागणी केली होती. दरम्यान, या चौघांना त्यांच्यावरील सर्व आरोपांत दोषी ठरवताना न्यायालयाने दहा आरोपींची निर्दोष सुटकाही केली होती.
मालाड मालवणी परिसरातील लक्ष्मीनगर झोपडपट्टीत जून २०१५ मध्ये हे दारूकांड घडले होते. या प्रकरणी पोलिसांनी १६ आरोपींविरोधात खटला दाखल केला होता. त्यापैकी एकाचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला, तर एक आरोपी फरारी आहे. या दुर्घटनेत १०६ जणांचा मृत्यू झाला आणि ७५ जणांना शारीरिक त्रास सहन करावा लागला. त्यात, काहीना कायमची दृष्टी गमावावी लागली, असे न्यायालयाने २९ एप्रिल रोजी खटल्याचा निकाल सुनावताना नमूद केले. सर्व आरोपी गुन्हेगारीच्या कटात सामील असल्याचा युक्तिवाद राज्य सरकारकडून करण्यात आला होता. मात्र, २४० साक्षीदारांच्या तपासणीअंती पुराव्यात आढळलेली अस्पष्टता पाहता सर्व आरोपींचा या कटातील सहभाग सिद्ध करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा ठपकाही न्यायालयाने ठेवला होता.