मुंबई : यंदा निर्बंधमुक्त वातावरणात जल्लोषात गणेशोत्सव साजरा झाला. मात्र करोनापूर्वकाळातील सुमारे २,७६२ घरगुती, तर २,०६६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदाही गणेशोत्सव साजरा केला नसल्याचे निदर्शनास आले आहे. यंदा १,७६,३०० घरगुती, तर ९,९६७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणरायाची प्राणप्रतिष्ठा करीत धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला. मात्र २०१९ च्या तुलनेत ही संख्या कमी आहे.
करोनाचा धोका लक्षात घेऊन २०२० मध्ये १,२४,९३० कुटुंबीयांनी, तर ६,४४३ गणेशोत्सव मंडळांनी अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला. मात्र करोनाची भीती, कडक निर्बंध यामुळे ५४,१३२ कुटुंबीयांनी आणि ५,५९० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव साजरा केला नाही. करोनापूर्वकाळात २०१९ मध्ये १,७९,०६ कुटुंबीयांनी आणि १२,०३३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव साजरा केला होता. या वर्षी १,५०,४५४ कुटुंबांनी, तर ८,०४९ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव साजरा केला होता.
यंदा करोना संसर्ग नियंत्रणात आल्याने राज्य सरकारने सर्वच निर्बंध हटविले होते. त्यामुळे यंदा मोठय़ा दिमाखात गणेशोत्सव साजरा झाला. सुमारे एक लाख ७६,३०० कुटुंबीयांनी आणि ९,९६७ मंडळांनी गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून गणेशोत्सव साजरा केला. करोनापूर्वकाळाच्या तुलनेत आजही २,७६२ कुटुंबीयांनी आणि २,०६६ मंडळांनी गणेशोत्सव साजरा केला नसल्याचे मुंबई महानगरपालिकेकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
विसर्जन मिरवणुकीलाही उपस्थिती कमी
करोनापूर्वकाळात गणेश विसर्जनाच्या निमित्ताने गिरगाव, दादर, जुहू यासह अन्य चौपाटय़ांवर भाविक प्रचंड गर्दी करीत होते. तसेच गणेश विसर्जन मिरवणुकांमध्येही भाविक मोठय़ा संख्येने सहभागी होत होते. मात्र यंदा त्या तुलनेत मिरवणुकांमधील गर्दी कमी होती. अनंत चतुर्दशीच्या दिवशी शुक्रवारी गणेश विसर्जन झाले. त्याला जोडून आलेला दुसरा शनिवार आणि रविवार असा सुट्टीचा योग विचारात घेऊन अनेकांनी पर्यटनासाठी जाणे पसंत केले. त्यामुळे विसर्जन मिरवणुकांमध्ये २०१९ च्या तुलनेत काही अंशी गर्दी कमी होती.