मुंबई – नवी मुंबई प्रवास अवघ्या २० ते २२ मिनिटांत व्हावा यासाठी हाती घेण्यात आलेल्या मुंबई पारबंदर प्रकल्पातील (शिवडी – न्हावाशेवा सागरी सेतू) २१.८१ किमी लांबीच्या सागरी सेतूचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता या सेतूवरून वाहने, मालवाहू वाहने, बांधकाम साहित्य नेणे शक्य होणार आहे. यानिमित्ताने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) बुधवारी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या वेळी उपस्थितीत राहणार आहेत. ते सागरी सेतूवरून वाहनाने प्रवासही करणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एमएमआरडीएने ९ मे रोजी पारबंदर प्रकल्पातील शेवटच्या ७० वा ऑर्थोट्रॉपिक स्टील डेकचे (पोलादी कमान) काम पूर्ण करून एक महत्त्वाचा टप्पा पार केला होता. आता सागरी पुलाचे बांधकाम पूर्ण करून पुढचा  एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा पार केला. काम पूर्ण झाल्याने आता मुंबई आणि मुख्यभूमी अर्थात शिवडी – चिर्ले भाग एकमेकांशी जोडला गेल्याची माहिती एमएमआरडीएतील अधिकाऱ्याने दिली.

 शिवडीवरून वाहने थेट चिर्लेपर्यंत नेता येणार आहेत. २१.८१ किमी लांबीच्या सागरी सेतूचा १६.५ किमीचा भाग समुद्रातून जातो; तर ५.५ किमीचा भाग जमिनीवर आहे. १६.५ किमीचे काम करण्यासाठी एमएमआरडीएने सागरी सेतूला संलग्न असा काही किमी लांबीचा एक तात्पुरता पूल उभारून त्यावरून बांधकाम साहित्य नेण्यात येत होते. तसेच यासाठी उद्वाहन, बोटींचाही वापर करण्यात येत होता, पण आता सागरी पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्याने त्यावरून वाहने नेता येणार आहेत.  उर्वरित कामे आणि तांत्रिक, टोलसंबंधीची कामे पूर्ण करणे सोपे होणार आहे. महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. हा टप्पा यशस्वीपणे पूर्ण झाला असून यानिमित्ताने लवकरच एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.