मुंबईत रेल्वे अपघातात बळी पडणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. याच घटनेला भावेश नकाते हा 21 वर्षीय तरुण बळी पडला आहे. मध्य रेल्वेच्या दिवा आणि कोपर या स्थानकांदरम्यान चालत्या गाडीतून तोल जाऊन पडल्याने भावेशचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातामुळे ट्रेनमधील गर्दीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
भावेशने ऑफिसला जाण्यासाठी डोंबिवलीहून सीएसटीला जाणारी ८.५९ ची लोकल पकडली होती. मात्र, डोंबिवली स्थानकावरील प्रचंड गर्दीमुळे भावेशला गाडीच्या डब्यामध्ये पूर्णपणे शिरायला जमले नाही. त्यामुळे भावेश कसाबसा लोकलच्या दरवाजावर लटकत होता. अखेर कोपर-दिवा स्थानकादरम्यान भावेशचा हात सुटल्याने तो चालत्या लोकलमधून खाली पडला. अपघातानंतर रेल्वे पोलिसांनी भावेशला डोंबिवलीच्या शास्त्री नगर रुग्णालयात दाखल केले. पण तोपर्यंत भावेशचा मृत्यू झाला होता.

Story img Loader