मुंबई : देशभरात ज्येष्ठ नागरिकांसाठी फक्त २१ हजार घरांची निर्मिती झाली आहे. त्यातही ६२ टक्के घरे दक्षिण भारतात असून कोईम्तूर, चेन्नई आणि बंगळुरु या शहरांनी यापैकी ४० टक्के वाटा उचलला आहे. महाराष्ट्राने ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र धोरणाचा मसुदा जारी केला असला तरी घरांची निर्मिती आशादायक नाही, असा सूर नाशिक येथे झालेल्या दोन दिवसांच्या देशभरातील विकासकांच्या ‘न्यू इंडिया समीट’ या परिषदेत काढण्यात आला.
‘कन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स ऑफ इंडिया’ (क्रेडाई) यांच्यासह ‘केपीएमजी’ या जागतिक पातळीवरील लेखा कंपनीने देशातील ज्येष्ठ नागरिकांच्या गृहनिर्माणाबद्दल जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. सध्या देशातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या १५ कोटी आहे. ती २०५० मध्ये ३४ कोटी होण्याची शक्यता आहे. जगातील ज्येष्ठ नागरिकांच्या एकूण लोकसंख्येपैकी २० टक्के ज्येष्ठ नागरिक भारतात आहेत. परंतु त्यांच्या गृहनिर्माणाच्या दृष्टीने विचार करण्यात आलेला नाही.
ज्येष्ठ नागरिकांना परवडणारी घरे असा त्याचा गाभा असला पाहिजे. ज्यांची ऐपत नाही अशा ज्येष्ठ नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत खास गट निर्माण करून घरे उपलब्ध करुन दिली पाहिजेत, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अशा योजना राबविणाऱ्या विकासकांना खास कर सवलत उपलब्ध करुन देतानाच ज्येष्ठ नागरिकांना मालमत्ता करातून सूट देण्याची गरजही अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रकल्प राबविणाऱ्या विकासकांना वस्तू व सेवा करात सवलत देऊन करपरतावा उपलब्ध करुन देणे तसेच पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत भाज्यांची घरे ज्येष्ठ नागरिकांना उपलब्ध करुन देता येतील, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहनिर्माण करणे म्हणजे एक प्रकल्प राबविणे या नजरेतून त्याकडे पाहू नका. असे प्रकल्प राबविताना ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविणे महत्त्वाचे आहे. तात्काळ आरोग्य सुविधा पुरविणे तसेच त्यांच्या विरंगुळ्यासाठी व्यवस्था करणे, या बाबी आवश्यक असल्याचे केपीएमजी इंडियाचे बिझनेस हेड चिंतन पटेल यांनी यावेळी सांगितले.
जगभरात ज्येष्ठ नागरिकांच्या गृहनिर्माणाची मागणी सतत वाढत आहे. विकासकांसाठीही हा वेगळा खरेदीदार आहे. विशेषत: महाराष्ट्रात अशा घरांना लक्षणीय मागणी सेकंड होमच्या रूपाने मिळत आहे. याकडे विकासकांनी लक्ष पुरवायला हवे. दुसऱ्या व तिसऱ्या थरांतील शहरांमध्ये अशा घरांना मागणी आहे. पुण्यापाठोपाठ नाशिक हे त्यापैकी एक आहे, असे क्रेडाईचे अध्यक्ष बोमन इराणी यांनी सांगितले.
नाशिक हे या दिशेने आश्वासक स्थळ असून शासनाकडूनही अधिकाधिक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. क्रेडाईने त्यामुळे आपली सहावी देशव्यापी परिषद नाशिक येथे भरविल्याचे क्रेडाईचे नियोजित अध्यक्ष शेखर पटेल यांनी सांगितले.
ब्रॅंड विकसित करा, दर आपोआप मिळेल – अभिनंदन लोढा
अयोध्येत आपल्याला सहा ते दहा पट दर अधिक मिळाला याचे कारण आपला ब्रॅंड हे आहे. खरेदीदार तुम्हाला दर द्यायला तयार आहेत. परंतु विश्वास व गुणवत्ता या जोरावर निर्माण झालेल्या ब्रॅंडची ती किंमत आहे. तुम्ही ब्रॅंड निर्माण करण्यावर भर द्या, असा सल्ला ‘हाऊस ॲाफ अभिनंदन लोढा’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अभिनंदन लोढा यांनी एका मुलाखतीत दिला.