मुंबई : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ई चलन प्रणालीद्वारे आकारला जाणारा दंड भरण्यास वाहनचालक टाळाटाळ करत आहेत. मुंबई महानगर क्षेत्रातील वेगवेगळय़ा पोलीस आयुक्तालयांमध्ये जानेवारी ते जुलै या ७ महिन्यांत तब्बल २१५ कोटींचा दंड थकवला आहे. मुंबई शहरात सर्वाधिक १६४ कोटी ७७ लाखांचा, तर ठाण्यातही ४६ कोटी ४९ लाखांचा दंड वाहनचालकांनी थकविला आहे. ही वसुली करण्यासाठी मोहिमा आखल्या जात असल्या तरी दिवसागणिक हा आकडा वाढतच आहे.
२०१९ पासून ई-चलन प्रणाली लागून करण्यात आली होती. ई- चलन यंत्राद्वारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंड आकारला जातो. तो संबंधित वाहनमालकाच्या नावावर जमा होतो. वाहतूक पोलिसांच्या ‘महाट्रॅफिक’ या अॅपवर जाऊन तो १४ दिवसांत ऑनलाइन भरायचा असतो. मात्र, वाहनचालक दंड भरण्यास टाळाटाळ करत असल्याचे चित्र आहे.
आव्हान कायम.. वाहनचालकांना दंड भरण्यासाठी १४ दिवसांची मुदत असते, परंतु तरी ते मुदतीत दंड भरत नाही. यासाठी दर ३ महिन्यांनी लोकअदालतीचे आयोजन केले जाते. यात दंड असलेल्या वाहनचालकांना नोटीस पाठवून तडजोड करून दंडाची रक्कम भरण्यास सांगितले जाते. त्यातही कुणी दंड भरला नाही तर त्यांच्यावर खटले दाखल करता येतात, अशी माहिती वसई वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सागर इंगोले यांनी दिली.