मुंबई : कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघाताची घटना ताजी असताना शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेल्या बेस्ट उपक्रमाच्या मालकीच्या वाहनांमध्ये प्रचंड घट झाल्याचे उघडकीस आले आहे.  गेल्या पाच वर्षांत बेस्टने आयुर्मान संपुष्टात आलेल्या तब्बल २१६० बस भंगारात काढल्या असून  त्याबदल्यात केवळ ३७ नवीन बसगाड्या घेतल्या आहेत. बेस्टच्या मालकीच्या केवळ १०६१ बस ऑगस्ट २०२४ पर्यंत कार्यान्वित होत्या, असे माहिती अधिकार कायद्याअंतर्गत उपलब्ध माहितीतून स्पष्ट झाले.

 मुंबईची लोकसंख्या सतत वाढत असताना बेस्ट बसची ही परिस्थिती चिंताजनक आहे. बेस्टने २,१२६ बसगाड्या भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत.  मागील काही आठवड्यात समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या चित्रफितींमध्ये बस थांब्यांवर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत. अनेक प्रवासी बसची प्रतीक्षा करत आहेत आणि अतिगर्दीमुळे बसमध्ये चढताही येत नाही, अशी दृश्ये या चित्रफितीत दिसत आहेत. बेस्ट उपक्रमातील स्वमालकीचा ताफा हळूहळू कमी झाला असून भाडेतत्त्वावरील बसची संख्या वाढत आहे. बेस्ट बस व्यवस्थेच्या खासगीकरणामुळे कायम स्वरुपी कर्मचारी आणि प्रवासी मेटाकुटीला आले आहेत. भाडेतत्त्वावरील बसचे करर्चारी कमी पगारात काम करतात. तसेच या बसची देखभाल-दुरुस्ती होत नसल्याने प्रवासादरम्यान प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. बेस्ट बसचा स्वमालकीचा ताफा कमी होत असल्याने अनेक बस मार्ग बंद झाले आहेत. भाडेतत्वावरील अनेक बसगाड्यांची दुरूस्तीच होत नसल्याने वातानुकूलित यंत्रणा अधूनमधून बंद पडत आहे. अचानक बस ब्रेक डाऊन होण्याच्या घटनाही घडत आहेत.

हेही वाचा >>>रॅगिंगविरोधी नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचा वैद्यकीय महाविद्यालयांना इशारा

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात स्वमालकीच्या १०६१ बस आणि उर्वरित भाडेतत्त्वावरील बस आहेत. बेस्ट उपक्रमातील खासगी बस पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांकडे कंत्राटी पद्धतीने चालक, वाहक आणि इतर कर्मचारी काम करीत असून तेच या बसगाड्यांवर कार्यरत आहेत. परंतु, अवेळी वेतन मिळणे, वेतनवाढ न होणे, साप्ताहिक सुट्टीव्यतिरिक्त अन्य सुट्ट्या नसणे आदी प्रश्नांमुळे हे कर्मचारी त्रस्त आहेत. त्यामुळे मुलांचे शिक्षण, घरखर्च, कुटुंबियांचा आरोग्य खर्च व महत्त्वाच्या गरजा पूर्ण होत नाही. परिणामी, कंत्राटी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी अधूनमधून आंदोलन करीत आहेत. अनेक कर्मचारी विश्रांंती न घेता अतिरिक्त काम करीत असल्याचने त्याचा थेट परिणाम कामावर होत असल्याने अपघात होत आहेत, असा दावा करण्यात येत आहे. कमी झालेले उत्पन्न आणि वाढलेला खर्च, तिजोरीतील खडखडाट, दैनंदिन खर्च भागवताना करावी लागणारी तारेवरची कसरत आणि कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर देण्यासाठी करावी लागणारी धावपळ अशी विचित्र अवस्था बेस्ट उपक्रमाची झाली आहे.

Story img Loader