मुंबईः शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली नौदल अधिकाऱ्याची २२ लाख रुपयांची सायबर फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून गेल्या काही महिन्यांमध्ये अशा प्रकारे फसणवूक करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या प्रकरणी दक्षिण प्रादेशिक सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून बँक खात्यातील व्यवहाराच्या मदतीने पोलिसांनी सांताक्रुझ येथील रहिवासी असलेल्या आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून पाच लाख रुपये जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
तक्रारदार नौदलाचे अधिकारी असून करंजा येथे कार्यरत आहेत. त्यांनी समाज माध्यमांवर एक जाहिरात पाहिली होती. त्या जाहिरातीवरील लिंकवर त्यांनी क्लिक केले. त्यानंतर त्यांना एका कंपनीच्या नावाने असलेल्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामावून घेतले गेले. त्या ग्रुपवर शेअर ट्रेडिंगची माहिती पुरवली जात होती. मे महिन्यात अविनाश शर्मा, करण मोदी व अक्षता या नावाने आरोपींनी त्यांच्याशी संपर्क साधला. तक्रारदार यांना संदेश पाठवून ट्रेडिंग साठी एक अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. अॅप डाऊनलोड झाल्यावर माहिती देण्यात (केवायसी) आली. एक महिला ही त्यांना पैसे जमा करण्यास सांगत होती. त्यानुसार तक्रारदार हे ठरविक रक्कम त्या खात्यात पाठवत होते. रक्कम पाठवल्यानंतर त्याना खरेदी केलेल्या शेअर्सवर फायदा झालेला दिसत होता. या घटनेनंतर महिलेने तक्रारदार यांना त्या ग्रुपमधून बाहेर पडण्यास सांगून दुसऱ्या ग्रुपमध्ये सामील केले. महिलेने दिलेल्या सूचनेनुसार तक्रारदाराने एकूण २२ लाख ९१ हजार रुपये अॅपमध्ये जमा केले. पैसे गुंतवल्यानंतर त्याने जमा झालेला नफा काढण्यासाठी महिलेला विनंती केली. तिने अॅपवर जाऊन नफा कसा काढायचा हे सांगितले. दोन वेळा त्यांनी जमा झालेला नफा काढला होता. अॅपवर त्यांना चांगला नफा झाल्याचे दिसले. कंपनीचे शुल्क घेऊन बाकीचे पैसे खात्यात वर्ग करण्यास तक्रारदार याने सांगितले. तेव्हा त्यांना आणखी रक्कम भरण्यास सांगण्यात आले. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर दक्षिण प्रादेशिक सायबर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
तपासणीत शोएब एलेक्स अॅन्थोनी नावाच्या व्यक्तीच्या बँक खात्यात पाच लाख रुपये जमा झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. याबाबत तपासणी केली असता ते बँक खाते ममन मुन्सी नावाची व्यक्ती वापरत असल्याचे निष्पन्न झाले. अखेर त्याला याप्रकरणी सांताक्रुझ येथून अटक करण्यात आली. याप्रकरणी पाच लाख रुपये हस्तगत करण्यात आले असून आरोपी मुख्य आरोपीच्या संपर्कात होता. त्याची चौकशी सुरू आहे.