विद्यापीठावरील महाविद्यालयांचा भार यंदाही वाढणार असून मुंबई विद्यापीठात येत्या शैक्षणिक वर्षांपासून २२ नवी महाविद्यालये सुरू होणार आहेत. गेल्याच वर्षी ७१ नव्या महाविद्यालयांना परवानगी दिल्यानंतर मुंबई विद्यापीठात यंदाही महाविद्यालयांच्या संख्येत भर पडणार आहे. नव्या शैक्षणिक वर्षांपासून (२०१९-२०) विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात २२ महाविद्यालये सुरू होणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत या महाविद्यालयांना परवानगी देण्यात आली आहे. विद्यापीठाने शासनाला सादर केलेल्या बृहत् आराखडय़ानुसार २२ महाविद्यालये सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली होती. त्यासाठी विद्यापीठाकडे १४०हून अधिक प्रस्ताव आले होते. प्रस्तावांची छाननी, तपासणी यानंतर २२ महाविद्यालयांना परिषदेने संमती दिली आहे. यामध्ये सहा रात्र महाविद्यालयांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे तुकडीवाढ, प्रवेश क्षमता वाढीच्या काही प्रस्तावांनाही संमती देण्यात आली. मात्र यामध्ये विधि विद्याशाखेच्या महाविद्यालयांना परवानगी देण्यात आली नसल्याचे परिषदेच्या सदस्यांनी सांगितले.

विद्यापीठांमध्ये विद्यार्थी निवडणुकांची तयारी सुरू झाली असून व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये विद्यार्थी निवडणूक व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यासही मंजुरी देण्यात आली. त्यामुळे जून महिन्यात महाविद्यालये सुरू होण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या निवडणुकाही रंगणार असल्याचे दिसते आहे. शासनाच्या आदेशानुसार विद्यापीठामध्ये तक्रार निवारण समितीही स्थापन करण्यास परिषदेने नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये मंजुरी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 22 new colleges in mumbai university