मुंबई : राज्यात अनागोदीची स्थिती आहे. सरकारमधील मंत्र्यांवर गंभीर आरोप आहेत. कायदा सुव्यवस्थेची स्थिती ढासळली आहे. राज्यात रोज २२ बलात्कार आणि ४५ विनयभंगाच्या घटना घडत आहेत. आरोपींवर कारवाई होत नसल्यामुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक राहिला नाही, असा आरोप अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.

राज्याचा गुन्हे अहवाल दरवर्षी प्रसिद्ध केला जातो. पण, गत दोन वर्षांपासून गुन्हे अहवाल प्रसिद्ध करण्यात आला नाही. जाणीवपूर्क गुन्ह्यांची माहिती दडवली जात आहे. राज्यात २०२४ मध्ये ७ लाख ८२ हजार ९६० गुन्हे घडले आहेत. अमरावती परिक्षेत्रात दंगलीचे ५६४ गुन्हे घडले आहेत. नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत २०८८ खूनाच्या घटना घडल्या आहेत. बलात्काराच्या घटना वाढल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये १६६, पुण्यात ५०६ नागपुरात २९७ बलात्काराचे गुन्हे घडले आहेत. २०२४ मध्ये एकूण ७,९८२ बलात्काराच्या आणि १६,२०० विनयंभगाच्या घटना घडल्या आहेत. म्हणजे रोज २२ बलात्कार आणि ४५ विनयभंगाच्या घटना घडत आहेत.

पोलिसांकडून आरोपींवर कारवाई होत नसल्यामुळे आरोपी मोकळे सुटले आहेत. आरोपींना पोलिसांची भीती राहिली नाही. महिलांसाठी २०२२ मध्ये ‘मिशन शक्ती’ अभियान राबविले गेले, त्यासाठी प्रस्तावित रकमेच्या फक्त २२ टक्के रक्कम खर्च झाली, असा आरोपही दानवे यांनी केला. राज्यातील कारागृहांमध्ये कैदी कोंबून भरले आहेत. कारागृहांतील बंदींची क्षमती २७ हजार असताना, आजघडीला कारागृहात ४३ हजार कैदी आहेत. क्षमतेपेक्षा १६ हजार कैदी जास्त असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

‘जो भाजपच्या विरोधात त्याच्यावर गुन्हे’ मानवाधिकार आणि शवविच्छेदन अहवालामध्ये पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला, असे स्पष्टपणे म्हटले आहे. तरीही, सूर्यवंशीला मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होत नाही. गुन्हा दाखल झाल्यावर तत्काळ मंत्र्याच्या मुलाचे विमान वळविले जाते. पण, संतोष देशमुख प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहे, असे का होते. भोकरदनमध्ये एका तरुणाला चटके दिले गेले. पोलिसांना पुरावे दिले तरी आरोपी सापडत नाही. मात्र, या प्रकरणी त्या ठिकाणी नसलेल्या शिवसेनेच्या नवनाथ दौड या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले गेले आहेत. जो भाजपच्या विरोधात जाईल, त्याच्यावर गुन्हे दाखल केले जात आहे, असा आरोपही दानवे यांनी केला.