मुंबई: लग्नास नकार दिल्याने एका २२ वर्षीय तरुणीने शनिवारी दोन वेळा भायखळा रेल्वे स्थानकात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले. आत्महत्येचा पहिला प्रयत्न फसल्यानंतर थेट भायखळा रेल्वे स्थानकात भरधाव वेगात येणाऱ्या लोकलसमोरच ती उभी राहिली. या प्रकारामुळे स्थानकात उपस्थित प्रवाशांचे धाबेच दणाणले. मात्र रेल्वेच्या सुरक्षा दलातील (आरपीएफ) कर्मचारी, लोकलचा मोटरमन आणि एका प्रवाशाच्या सतर्कतेमुळे या तरुणीचे प्राण वाचले. या तरुणीचे प्राण वाचविणारे आरपीएफ सहाय्यक उपनिरीक्षक रवींद्र सानप यांचे कौतुक होत आहे.
हेही वाचा >>> मोबाईलच्या वापरावरुन कौटुंबिक संघर्ष ; रात्रभर मोबाईल हाताळण्यास न दिल्यामुळे पत्नीची पतीला मारहाण
अर्चना पटेल (२२ वर्ष-नाव बदलेले आहे) या तरुणीचे एका ३० वर्षीय तरुणावर प्रेम होते. शनिवार, २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.४५ च्या सुमारास हे दोघेही भायखळा स्थानकात आले होते. लवकरात लवकर विवाह करू या अशी गळ अर्चनाने तरुणाला घातली. मात्र तरुणाने त्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडणही झाले. आत्महत्या करण्याची धमकी देऊन अर्चना तेथून निघून गेली. भायखळा स्थानकातील फलाट क्रमांक १ वरील रुळावर उतरून डाऊनला जाणाऱ्या लोकलसमोर ती उभी राहिली. त्यावेळी फलाटात थांबलेल्या लोकलच्या मोटरमनने हाॅर्न वाजवण्यास सुरूवात केली. एक तरुणी लोकलसमोर उभे असल्याचे पाहताच उपस्थित आरपीएफचे सहाय्यक उपनिरीक्षक रवींद्र सानप आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाचे कर्मचारी गजानन मुसले आणि अन्य प्रवाशांनी तिची समजूत काढली आणि तिला रुळावरून बाजूला केले.
हेही वाचा >>> ठाणे : अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार ; समाजमाध्यमावर झाली होती ओळख
त्यानंतर फलाट क्रमांक २ वरून सीएसएमटीच्या दिशेला जाणारी लोकल दिसताच अर्चना पुन्हा रुळावर उतरली आणि चिचंपोकळी स्थानकाच्या दिशेने जाऊ लागली. तरूणीचा पवित्रा पाहून आरपीएफ कर्मचारी सानप यांनी धावत जाऊन समोरून येणारी लोकल हात उंचावून थांबविण्याचा प्रयत्न केला. रुळावर तरूणी उभी असल्याचे पाहून मोटरमननेही गाडीचा वेग कमी केला आणि हाॅर्न वाजवून तिला रुळावरून बाजूला जाण्याची सूचना ते करीत होते. लोकल अर्चनाच्या अगदी जवळ येताच पाठीमागून धावत आलेल्या सानप यांनी तिला रुळावरून बाजूला केले. यावेळी अन्य एक प्रवासीही सानप यांच्या मदतीला धाऊन आला. त्यामुळे या अर्चनाचे प्राण वाचले. अर्चनाला भायखळा रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलीस चौकीत नेण्यात आले. तेथे तिची विचारपूस करण्यात आल्यानंतर घडलेल्या प्रकाराचा उलगडा झाला. त्यानंतर आरपीएफने अर्चनाच्या प्रियकरालाही शोधून काढले. आरपीएफ, लोहमार्ग पोलीस, स्टेशन मास्तर आदींनी दोघांची समजूत काढली. अखेर आपल्या हातून घडलेल्या प्रकाराबद्दल दोघांनीही माफी मागितली. तसेच अर्चनाने रेल्वे सुरक्षा दलाचे आभार मानले.