मुंबई : चेंबूर परिसरात चाकूने वार करून २२ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी आरसीएफ पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून दोन तरुणांना मंगळवारी अटक केली. मृत तरुण आणि आरोपी एकाच परिसरात वास्तव्यास असून किरकोळ भांडणानंतर आरोपींनी तरुणावर चाकूने हल्ला केला. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

विघ्नेश नारायण चांदले (२२) असे मृत तरूणाचे नाव असून तो चेंबूर वाढवली येथील चांदले हाऊसमध्ये वास्तव्यास होता. त्याचा भाऊ प्रथमेश चांदले यांच्या तक्रारीवरून आरसीएफ पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१), ३५२, ३५१ (२), ३ (५) व शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायदा कलम ४ व २५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरसीएफ पोलिसांनी तात्काळ पथक स्थापन करून सुमित अंबुरे (२१) व ओमकार मोरे (२२) यांना मंगळवारी अटक केली.

तक्रारीनुसार, विघ्नेश चांदलेचे आरोपी सुमित अंबुरे व ओमकार मोरे यांच्यासोबत भांडण झाले होते. त्या वादातून वाढवली येथील जरीमरी माता मंदिराजवळ दोन्ही आरोपींनी विघ्नेशला गाठले. त्यावेळी तेथेही त्यांच्या वाद झाला. आरोपींनी विघ्नेशला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर ओमकार मोरेने विघ्नेशवर चाकूने हल्ला केला. त्यानंतर विघ्नेश खाली कोसळला. त्याला शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी विघ्नेशला तपासून मृत घोषित केले. याबाबत आरसीएफ पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. विशेष पथक स्थापन करून अंबुरे व मोरे दोघांनाही राहत्या परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्यांचा गुन्ह्यांत सहभाग स्पष्ट झाल्यानंतर आरसीएफ पोलिसांनी मंगळवारी त्यांना अटक केली. न्याययवैद्यक तज्ज्ञांच्या मदतीने पोलिसानी घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांना हत्येसाठी वापरलेला चाकूही सापडला असून तो जप्त करण्यात आला आहे. तो लवकरच न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पुढील तपासणीसााठी पाठवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी व मृत तरूण एकाच परिसरात राहतात. तक्रारीनुसार त्यांच्यात आधी भांडण झाले होते. त्या वादातून आरोपींनी ही हत्या केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पोलिसांनी काही जणांचा जबाब नोंदवला आहे. दोन्ही आरोपींविरोधात यापूर्वी एकही गुन्हा दाखल नाही.

Story img Loader