पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून दरवर्षी करण्यात येणाऱ्या  नालेसफाईसाठी आगामी वर्षात २२६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.  मोठ्या आणि छोट्या  नाल्यांसाठी प्रत्येकी ९० कोटी रुपये आणि मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी ४६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नदी व नाल्यांमधील गाळ काढण्यात येतो. संपूर्ण वर्षभरातील नालेसफाईपैकी ७० टक्के गाळ पावसाळ्याआधी काढला जातो. तर १५ टक्के  पावसाळ्यादरम्यान, तर १५ टक्के  पावसाळ्यानंतर गाळ काढला जातो.  एप्रिल महिन्यापासून प्रत्यक्ष नालेसफाईच्या कामांना सुरूवात करण्यात येते. नालेसफाई आणि त्यासाठी केला जाणारा खर्च यावरून नेहमीच मुंबई महानगरपालिकेवर टीका करण्यात येते. नालेसफाईसाठी कोट्यवधी रुपये खर्च होत असले तरी दरवर्षी पावसाळ्यात मुंबईत पाणी तुंबते. नालेसफाई केली की दुसऱ्या दिवशी पुन्हा नाल्यातील पाण्यावर कचरा तरंगताना दृष्टीस पडतो. यावर्षीही महानगरपालिकेने नालेसफाईच्या कामासाठी निविदा मागवल्या आहेत. मात्र अद्याप कंत्राटदाराची नियुक्त करण्यात आलेले नाही. मात्र यंदा पावसाळयासाठी महानगरपालिका प्रशासनाने नालेसफाईच्या कामासाठी २२६ कोटी रुपयांची तरतूद २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. प्रशासकीय राजवटीत यंदा नालेसफाईची कामे होणार आहेत.

हेही वाचा >>> मुंबई : बाळकुममधील विजेत्यांना अखेर घराची रक्कम भरण्यासाठी मुदतवाढ, निवासी दाखला मिळाल्यानंतर रक्कम भरून घेणार

मुंबईला चारही बाजूने समुद्राने वेढलेले असून मुंबईचा बराचसा भाग खोलगट बशीसारखा सखल आहे.  मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी होत असल्यामुळे पावसाचे पाणी वाहून नेणारे पर्जन्यजल वाहिन्यांचे जाळे त्यादृष्टीने महत्त्वाचे आहे. मुंबई व उपनगरात ३०९ मोठे नाले आणि १५०८ छोटे नाले, रस्त्याच्या कडेला असलेली २००० किमी लांबीची गटारे, पाच नद्या यांतून पावसाचे पाणी समुद्रात जात असते. मात्र नाले, गटारे यामध्ये वर्षभर समुद्रातून येणारा व आजूबाजूच्या वस्त्यांमधून टाकला जाणारा कचरा, प्लास्टिक, गाद्या, उशा, लाकडी साहित्य असा वाटेल तो कचरा टाकला जातो. त्यामुळे नाले तुंबतात. पावसाचे पाणी वाहून जाण्यास वाट मिळावी यासाठी नाल्यातील कचरा आणि गाळ काढणे आवश्यक असते.

दरवर्षी नालेसफाईच्या साधारण ४८ कामांसाठी निविदा मागविण्यात येतात. मुंबईतील मोठे नाले, छोटे नाले तसेच मिठी नदी यांची एकूण लांबी ही सुमारे ६८९ किमी एवढी आहे. मोठ्या नाल्यातून जवळपास चार लाख ६३ हजार मेट्रीक टन, तसेच  छोटे नाले व पावसाळी गटारे यांतून चार लाख २४ हजार मेट्रीक टन गाळ काढला जातो. एकूणच जवळपास आठ लाख ८८ हजार मेट्रीक  टन गाळ काढून  मुंबई बाहेरील कचराभूमीत टाकण्यात येतो.

एकूण नद्या …..५

मोठे नाले ……३०९ (लांबी २९० किलोमीटर)

छोटे नाले ……..५०८  (लांबी ६०५ किलोमीटर)

रस्‍त्‍यालगत गटारे ……. लांबी जवळपास २,००४ किलोमीटर

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 226 crore rupees provision for nullah cleaning in bmc budget 2023 mumbai print news zws