लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: गेल्या काही महिन्यांमध्ये उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्या बहुसंख्य प्रवाशांनी गारेगार प्रवासासाठी वातानुकूलित लोकलला पसंती दर्शविली होती. त्याचबरोबर तिकीट दर कमी केल्यामुळे वातानुकूलित लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी वाढू लागली. परिणामी, गतवर्षी एप्रिल – जूनदरम्यानच्या तुलनेत यंदा ४९.४८ लाख प्रवाशांनी वातानुकूलित लोकलमधून प्रवास करणे पसंत केले असून गतवर्षीच्या तुलनेत त्यात सुमारे २२.८८ लाखांनी वाढ झाली आहे. प्रवासीसंख्या वाढल्यामुळे रेल्वेच्या महसुलात अतिरिक्त ११ कोटी रुपयांची भर पडली आहे.
एकेकाळी मध्य रेल्वेसाठी वातानुकूलित लोकल पांढरा हत्ती ठरली होती. प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी महसूल मिळत नसल्याने वातानुकूलित लोकलच्या देखभालीचा खर्च मध्य रेल्वेला सोसावा लागत होता. त्यामुळे वातानुकूलित लोकलचे तिकीट दर कमी करण्यात आले. तसेच, वातानुकूलित ४ लोकलच्या दिवसभरात ५६ फेऱ्या चालवण्यास सुरुवात करण्यात आली. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वातानुकूलित लोकलमुळे अधिक महसूल मिळाला आहे. वातानुकूलित लोकलमधून एप्रिल – जून २०२२ या कालावधीत २६.६० लाख प्रवाशांनी प्रवास केला. मध्य रेल्वेला यातून १२.१६ कोटी रुपये महसूल मिळाला. तर एप्रिल ते जून २०२३ या कालावधीत ४९.४८ लाख प्रवाशांनी गारेगार प्रवास केला असून गतवर्षाच्या तुलनेत प्रवासीसंख्येत ५३.७७ टक्क्यांनी वाढ झाली. तर, मध्य रेल्वेला या कालावधीत २३.२६ कोटी रुपये महसूल मिळाला असून त्यात ५२.०५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
तसेच वातानुकूलित लोकलमधून एप्रिल – जून २०२२ या कालावधीत दररोज सरासरी २९,२२१ प्रवासी प्रवास करीत होते. त्यातून दररोज सरासरी १३.३५ लाखांचे उत्पन्न मध्य रेल्वेला मिळत होते. तर, एप्रिल ते जून २०२२३ या कालावधीत दररोज सरासरी ५४,३४४ प्रवाशांचा प्रवास केला. त्यातून दररोज सरासरी २५.६५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
विनातिकीट प्रवासी वाढले
एप्रिल – जून २०२२ या कालावधीत ४,९०३ विनातिकीट प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून १७.७९ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. तर, एप्रिल – जून २०२३ या कालावधीत ९,५९३ विनातिकीट प्रवाशांची धरपकड करून त्यांच्याकडून ३१.९२ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला.
महिना प्रवासी संख्या
एप्रिल २०२२ १९,७९९
मे २०२२ ३१,०८५
जून २०२२ ३६,८११
एकूण ८७,६२२
महिना प्रवासी संख्या टक्केवारीत वाढ
एप्रिल २०२३ ५०,१०३ ३९.४५ टक्के
मे २०२३ ५६,३१५ ५५.२० टक्के
जून २०२३ ५६,६१५ ६५.०२ टक्के
एकूण १,६३,०३३ ५३.७७ टक्के