मुंबई : देशभरात वंदे भारत एक्स्प्रेस जाळे विणले जात असून अनेक महत्त्वाच्या स्थानकांना ही एक्स्प्रेस जोडली जात आहे. देशभरात सध्या १८ वंदे भारत एक्सप्रेस धावत असून मंगळवारी आणखीन पाच वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. त्यामुळे देशभरात २३ वंदे भारत धावणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी भोपाळ येथील राणी कमलापती स्थानकातून पाच वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविणार आहेत. यामध्ये राणी कमलापती (भोपाळ) ते इंदौर, भोपाळ ते जबलपूर, रांची ते पाटणा, धारवाड ते बंगळूरु आणि मडगाव ते सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेसला चालवण्यात येणार आहेत. दरम्यान, मडगाव ते सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेसचे चेअर कारचे साधारण तिकीट दर १,४३५ रुपये आहे, तर एक्झिक्युटिव्हचे तिकीट दर २,९२१ रुपये असे असणार आहेत.
पावसाळय़ातील वेळापत्रक
गाडी क्रमांक २२२२९/२२२३० मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस आठवडय़ातील तीन दिवस धावणार आहे. गाडी क्रमांक २२२२९ सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी पहाटे ५.२५ वाजता सीएसएमटीवरून सुटेल आणि मडगाव येथे दुपारी ३.३० वाजता पोहोचेल, तर गाडी क्रमांक २२२३० मडगाववरून दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी दुपारी १२.२० वाजता सुटेल आणि रात्री १०.२५ वाजता सीएसएमटी मुंबईला पोहोचेल. दोन्ही दिशेकडे जाणाऱ्या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थिवीम येथे थांबे देण्यात आले आहेत.
पावसाळय़ातील वेळापत्रकामुळे वेगमर्यादा वंदे भारत एक्स्प्रेसमुळे मुंबई आणि गोवा दरम्यानचा प्रवास वेळ कमी होण्याची शक्यता होती. मात्र मान्सून वेळापत्रकामुळे वंदे भारत एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल झाला असून वेगमर्यादा अद्याप निश्चित करण्यात आली आहे. मात्र, सीएसएमटी-दिवा १०५ किमी प्रति ताशी वेग, दिवा ते रोहा ११० किमी प्रति ताशी वेग असण्याची शक्यता आहे.